बाहेरगावी अडकलेले नागरिक मूळ ठिकाणी परत

चारूशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : एकिकडे करोना रुग्णांचा वाढता आलेख आणि दुसरीकडे टाळेबंदीत आलेली शिथीलता यामुळे लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे. टाळेबंदीत शिथीलता आल्याने बाहेर गावी अडकलेले पुन्हा मूळ ठिकाणी येत आहेत. तर संवेदनशील भागातून सुरक्षितता म्हणून काही मंडळी पाहुणे म्हणून मुक्कामी येत आहेत. करोना संसर्ग होईल या भीतीने स्थानिकांकडून अशा मंडळींना विरोध होत आहे. यामुळे वादात भर पडली असून काही तक्रारी थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेल्या आहेत.

शहर परिसरात करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा एक हजार ३०० पेक्षा अधिक आहे. २३० अहवाल प्रलंबित आहेत. शहरातील फुलेनगर, पंचवटी, वडाळागाव परिसर करोना उद्रेकाचा बिंदू ठरत असतांना नागरिकांमध्ये करोनामुळे भीती पसरली आहे. टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात शिथीलता आली असली तरी टाळेबंदीचे नियम शहरातील काही वसाहती, इमारतीमध्ये पूर्णत अमलात आणले जात आहेत. बाहेर गावातून येणाऱ्यांना इमारत परिसरात प्रवेश नाही. नातेवाईक किंवा अन्य कुठल्याही कारणाने त्यांना वसाहत परिसरात येऊ दिले जात नाही. सरकारने टाळेबंदीत शिथीलता आणली असली तरी वसाहत, इमारत परिसरातील व्यवस्थापनाने त्या ठिकाणच्या सदस्यांच्या  आई-वडिलांना, मुला-नातवंडाना देखील भेटायला येण्यास मनाई केली आहे. अनेक ठिकाणी वृद्ध घरकाम करून थकले आहेत.  मदतनीसांना बोलावण्यासाठी काकुळतीला आले आहेत. परंतु, टाळेबंदी तसेच करोना रुग्णांची वाढती संख्या याचा बागुलबुवा करत शहर परिसरातील अनेक सोसायटय़ांनी सदस्यांच्या बाहेर ये-जा करण्याच्या वेळांवर र्निबध घातले आहेत. जाता-येता नोंदणी वहीत स्वाक्षरी, घर दुरूस्ती किंवा अन्य कामासाठी घरात बाहेरील व्यक्ती बोलवायची असेल तर अध्यक्षांची परवानी बंधनकारक करण्यात आली आहे. बाहेरगावहून येणाऱ्या लोकांना इमारतीतील सदस्यांच्या घरात प्रवेश नाकारला आहे. कामगार वसाहत परिसरात तर बँक किंवा अन्य कामासाठी दिलेल्या गाळ्यांमधील व्यवसायिक भाडेकऱ्यांना बाहेर काढण्याचा तगादा स्थानिकांनी लावला आहे. यामुळे दिवसागणिक वादात भर पडत असून काही तक्रारी थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहचत आहेत.

याविषयी श्रध्दा विहार परिसरात राहणाऱ्या यशश्री रहाळकर यांनी आपला अनुभव मांडला. आमच्या वसाहत परिसरात ९६ घरे आहेत. टाळेबंदी आणि आता शिथीलता आल्यावरही नियम कडक आहेत. बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांची थर्मल तपासणी होते.

इमारतीतील सदस्यांसह बाहेरून येणाऱ्या गृह मदतनीसांचाही त्यात समावेश आहे. विशिष्ट भागातील गृहसेविकांना कामावर बोलवू नका, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच टाळेबंदी शिथील झाली असली तरी तुम्ही बाहेर पडू नका किंवा तुमच्याकडे बाहेर गावाहून पाहुणे बोलावू नका, असे सोसायटीच्या वतीने फर्मान काढण्यात आले आहे. गावातील मित्र मंडळी भेटण्यास आलेली चालतात. परंतु, बाहेर गावच्या नातेवाईक-पाहुण्यांसह परिसरातील भाजीपाला, दूधवाला, पेपरवाला यांना बंदी असल्याचे रहाळकर यांनी नमूद केले. हाच धागा पकडत अनुजा पंत यांनी हरिशक्ती सोसायटीत पहिल्या दिवसापासून टाळेबंदीचे सर्व नियम पाळले जात असल्याचे सांगितले. बाहेर गावहून कोणी येणार असेल तर त्याची आरोग्य तपासणी करून तसे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्याला घरात प्रवेश दिला जातो.

गृहसेविका अजूनही कामावर येत नाही. इमारत स्वच्छतेसाठी एक कर्मचारी. तीही वसाहत परिसरातील सुरक्षारक्षकाची पत्नी असल्यामुळे तीला काम करू देण्यास विरोध नाही. भाजीपाला, दूध, पेपर, कचरा गोळा करणाऱ्यांनी वसाहतीत यायचे नाही, अशी सूचना फलकावर असून त्यानुसार आजही काम सुरू आहे. इमारतीच्या अशा नियमांमुळे नागपूरहून येणारे सासु-सासरे मूळ गावी परतल्याचे पंत यांनी सांगितले. सिडको परिसरात राहणारे संदिप वाघ यांनीही आपला अनुभव मांडला. मागील वर्षी कर्ज काढून घराचे तीन मजली बांधकाम केले.

खालील तळमजला खासगी वित्तीय संस्थेला भाडेतत्वावर दिला. परंतु, काही दिवसांपासून स्थानिकांकडून येथे होणारी गर्दी करोनाची असू शकेल, असे सांगत हा भाडेकरी काढा, गाळा काही दिवस बंद ठेवा असा तगादा लावला आहे. भाडेकरू काढल्यानंतर कर्जाचा हप्ता फेडायचा कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तक्रारी कमी झाल्या

टाळेबंदीच्या काळात बाहेर गावहून कोणी आला की त्याची माहिती दिली जात असे. त्यावरून वाद होत होते. आता सर्वच शिथीलता आली आहे. रुग्ण सर्वत्र सापडत आहेत. यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्या, असे सांगितले जात आहे. लोकांमध्ये आजाराविषयी असणारी भीती काही अंशी कमी झाल्याने तक्रारी कमी झाल्या आहेत.

– अशोक भगत (पोलीस निरीक्षक, पंचवटी ठाणे)