श्रीपाद छिंदमला आज अटक कराल, त्याला पक्षातून निलंबितही केले आहे, त्याला आतमध्ये काही दिवस ठेवाल. परंतू, महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या त्या छिंदमची जीभच छाटली पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. कोणीही उठून काहीही बोलत आहे. छिंदमविरुद्ध आंदोलन करणाऱ्या आमच्या लोकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. पोलिसांना मी सांगू इच्छितो, आमच्या लोकांना त्रास देवू नका. मौका सभी को मिलता है, वेळ आमचीही येणार आहे हे लक्षात ठेवा. त्यावेळी चुन चुन के मारेंगे, असा फिल्मी डायलॉगली मुंडे यांनी मारला.

हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी निफाडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी मुंडे यांनी शिवसेनेवरही हल्लाबोल केला. आत्ताची शिवसेना ही शिवसेना नसून ती भिवसेना झाली आहे. त्यांनी आत्ता फलकावर वाघाच्या चिन्हाऐवजी शेळी नव्हे तर सशाचे चिन्ह लावावे असा सल्ला दिला. तसेच सत्तेवर लाथ मारण्याची भाषा करत आहे. सारखी लाथ मारणारा प्राणी कोण, हे सर्वज्ञात आहे असा टोला त्यांनी लगावला.

राज्य सरकारवर टीका करताना मुंडे म्हणाले, चाबकाला एकवेळ बैल बुजतो तसेच कधी वाघ समोर आला तर तोही घाबरतो. परंतू सत्तेत जर गेंडा असेल तर चाबकाने त्याचे करायचे काय. या देशात आणि राज्यात महागाईचा आगडोंब उसळला आहे. रेशनवरील डाळ, साखर, तांदुळ, रॉकेल सरकारने बंद केले आहे. दुसरीकडे जो मका आपण गाई-गुरांना खायला घालतो तो मका हे मोदी-फडणवीस आपल्याला खावू घालत आहेत. त्यामुळे जनतेने काय करायचे याचा विचार करायला हवा असेही मुंडे म्हणाले.

मला तुमच्या मनातील सत्ता हवीय – सुप्रिया सुळे</strong>

लोकांचं प्रेम आणि विश्वास असेल तर काहीही कमी पडत नाही. मला आणि माझ्या पक्षाला असे मंत्रालय नको आहे जे आज आत्महत्यालय बनले आहे. मला तुमच्या मनातील सत्ता असलेले प्रेम हवे आहे अशी भावनिक साद यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेला घातली.

उध्दव ठाकरेंना कोणत्या गाडीत बसावे कळेनासे झालंय – जयंत पाटील</strong>

उध्दव ठाकरेंना सध्या कुठल्या गाडीत बसावे हे कळेना झाले आहे. हा गडी गाडीतही बसेना आणि खालीही उतरेना. कारण पापात कसं सहभागी व्हायचं असा प्रश्न पडला आहे. परंतू भाजपच्या प्रत्येक पापामध्ये शिवसेना सहभागी आहे, अशी टिका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली.