पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी पंचवटीतील तपोवनात जाहीर सभा होणार आहे. यानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा पोहचू नये, यासाठी गुरुवारी सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

महाजनादेश यात्रा आणि पंतप्रधानांची सभा या पाश्र्वभूमीवर शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि मंत्री येणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई दारूबंदी कायद्यान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शहरात मद्यविक्री, अबकारी अनुज्ञाप्ती, देशी-विदेशी मद्य, देशी दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.