संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर पालखीचे २० जून रोजी सकाळी प्रस्थान होणार आहे. पालखीचा मुक्काम प्रवास नाशिक, नगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांत होणार आहे. संस्थानच्या व्यवस्थापनाने केलेल्या मागणीनुसार उपरोक्त प्रवासात वारकऱ्यांसाठी माफक दरात गॅसपुरवठा, पिण्याचे पाणी, टँकर्स, औषधोपचार, पोलीस संरक्षण, रुग्णवाहिका आदी सुविधा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. संत निवृत्तिनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पालखी प्रवासात वारकऱ्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड व विश्वस्त पुंडलिकराव थेटे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी महाजन यांनी सुविधा पुरविण्याचे मान्य केले. या पालखीचा नाशिक, नगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांत मुक्काम होतो. या मार्गावर वारकऱ्यांना विविध अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना सूचना देण्याची मागणी व्यवस्थापनाने केली होती. पालखी प्रवासात वारकऱ्यांना कोणत्याही समस्या येणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले आहे.