कोटय़वधींची उलाढाल ठप्प

माथाडी कामगारांनी पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे मंगळवारी जिल्ह्य़ातील बहुतांश बाजार समित्यांचे कामकाज ठप्प होऊन शेतकऱ्यांची कोंडी झाली. संपामुळे जिल्ह्य़ातील सर्व बाजार समित्यांचा विचार केल्यास एकाच दिवसात कोटय़वधींची उलाढाल थंडावली. कांद्याचे लिलाव होऊ शकले नाही.

सरकारने माथाडी कामगार कायद्याचे पंख छाटण्याचे काम सुरू केले असून हा कायदा मोडीत काढण्याचे ठरवल्याचा आरोप करत या विरोधात हमाल मापाडी क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी संप पुकारला होता. नियमनमुक्तीच्या निर्णयाच्या विरोधात व्यापारी, माथाडी कामगारांनी बंद पाळण्याचा इशारा दिला होता. नियमनमुक्तीचा निर्णय शेतकरी हिताचा असून सरकारने व्यापारी, माथाडींच्या धमकीला भीक घालू नये, असे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. संपामुळे बाजार समितीच्या आवारातील कांद्यासह इतर शेतमालाचे लिलाव बंद होऊ शकले नाही. एरवी गजबजणाऱ्या बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

मनमाड, पिंपळगाव बसवंत, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत वेगळी स्थिती नव्हती. मक्यासह अन्य कडधान्ये पणन विभागाने नियमन मुक्त केल्याने हमाल मापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मनमाड बाजार समितीत सुमारे ५०० ट्रॅक्टरमधून सुमारे १० ते १२ हजार क्विंटल कांद्याची आवक होते. सुमारे ६० लाखाची उलाढाल होते. बाजार समिती बंद असल्याने आवक झाली नाही. बहुतांश बाजार समित्यांमधील माथाडी संपात सहभागी झाल्यामुळे बाजार समित्यांमधील कोटय़वधींची उलाढाल ठप्प झाली.

कांद्याचे भाव गडगडले

लासलगाव बाजार समितीत माथाडींच्या संपामुळे व्यवहार झाले नसल्याचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले. या बाजार समितीत प्रामुख्याने कांद्याचे लिलाव होतात.  बाजार समितीची दैनंदिन उलाढाल दोन ते अडीच कोटीच्या घरात आहे. सध्या उन्हाळ कांद्याचे भाव २००-३०० रुपयांपर्यंत खाली आले आहे. लिलाव बंद राहिल्याने सुमारे अडीच कोटीची उलाढाल ठप्प झाल्याचे होळकर यांनी सांगितले.