भाजपचा ‘रास्ता रोको’चा इशारा

नाशिक : शेतकरी कृषिमाल कोणत्याही शहरात, कोणत्याही बाजारपेठेत विकू शकतो असा सरकारी आदेश आहे. तथापि, नाशिक शहरात याउलट स्थिती निर्माण झाली असून महापालिका आणि पोलीस यंत्रणा पंचवटी परिसरात शेतकऱ्यांना अट्टल गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक देत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कादवा सहकारी कारखान्याचे संचालक सुनील केदार यांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे कृषिमाल विक्रीला अडचणी येत असून शेतकऱ्यांवरील अन्याय न थांबल्यास जिल्ह्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा केदार यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतमाल पेठ रोड आणि दिंडोरी नाक्यावरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीस आणतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर, बाजार समिती सर्व शेतमाल आवारात विक्रीस परवानगी देत नाही. त्यामुळे शेतकरी आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. ग्राहक आले तर ते त्यांना शेतमाल विकतात. तथापि, पोलीस आणि महापालिका या शेतकऱ्यांना माल विक्रीला मनाई करत आहे. मारहाण, शिवीगाळ आणि वाहनांच्या काचेवर काठय़ा मारतात, अशी तक्रारही केदार यांनी केली. शेतमाल आणि शेतकऱ्यांच्या जाळ्या जप्त केल्या जातात. ‘बाप भिक मागू देत नाही आणि आई काम करू देत नाहीह्ण अशी अवस्था जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आत प्रवेश देत नाही आणि पोलीस, महापालिका रस्त्यावर शेतमाल विकू देत नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

वास्तविक देशातील शेतकरी आपला शेतमाल कुठेही, कोणत्याही शहरात, बाजारपेठेत विकू शकतो. सरकारने तसा अध्यादेश काढला आहे. परंतु, नाशिक शहरात कृषिमाल विक्रीला अटकाव केला जात आहे. महापालिका, पोलिसांचे वाहन दिसले की शेतकरी आपले वाहने घेऊन पळत सुटतात. शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. या संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी असंख्य तक्रारी केल्या. शासनाने त्वरित दखल घेऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अन्यथा सर्व शेतकरी जिल्हाभर रास्तारोको करतील असा इशारा केदार यांनी दिला आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना सर्व सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. परंतु, बाजार समितीत मनमानी कारभार सुरू असून गैरव्यवहार, अनियमितता यामुळे सतत चर्चेत राहिलेल्या या बाजार समितीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. यामुळे करोना, नापिकी अतिवृष्टी, गारपीट यामुळे संकटात सापडलेला शेतकरी अधिक अडचणीत सापडला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, महानगरपालिका आणि नाशिक बाजार समिती यांनी त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केदार यांनी केली आहे.

शेतमाल विक्री करणारे चवली दलाल की शेतकरी?

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. करोना काळात बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी समितीशी संबंध नसलेल्या चवली दलालांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. शेतकऱ्यांना किरकोळ माल विक्रीसाठी पेठ रस्त्यावरील आवारात व्यवस्था केली गेली. तिथे केवळ शेतकरी माल विक्री करू शकतात. बाजार समितीच्या बाहेर पेठ रस्त्यावर चवली दलालांनी अनधिकृत बाजार थाटला असून तिथे मोठी गर्दी होते. संबंधितांनी महापालिकेच्या निश्चित केलेल्या मोकळ्या जागेत कृषिमाल विक्री करावा, असे वारंवार सांगूनही विक्रेते पेठ रस्त्यावरील जागा सोडत नाही. स्थानिकांना अनधिकृत भाजी बाजाराचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनधिकृतपणे कृषिमाल विक्री करणारे शेतकरी आहेत की चवली दलाल याची पडताळणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.