महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी सत्रातील अंतिम वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा १६ जुलैपासून घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात विद्यापीठाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परिस्थितीनुसार आणि शासनाच्या आदेशानुसार  वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे विद्यापीठाने म्हटले आहे. दरम्यान, विद्यापीठाचा ३० जून रोजी पुरवणी दीक्षांत सोहळा होणार आहे.

दरम्यान, विविध विद्याशाखेतील सुमारे ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना ३० जून रोजी पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या पुरवणी दीक्षांत सोहळ्यास कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच मान्यता दिली. २०१८ च्या परीक्षेत उत्तीर्ण आणि २९ जून २०२० पर्यंत प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या सोहळ्यात पदवी देण्यात येणार आहे. विद्यापीठ अधिनियमाप्रमाणे दोन वेळा पदवी प्रदान सोहळा होतो. पुरवणी दीक्षांतमध्ये विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत पदवी प्रदान केली जाते. विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र टपालाद्वारे संलग्नित महाविद्यालयाकडे पाठविण्यात येते. विद्यार्थ्यांनी ती संबंधित महाविद्यालयातून प्राप्त करावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून विहीत नमुन्यातील अर्ज २६ जूनपूर्वी विद्यापीठाकडे ईमेलद्वारे सादर करावा. मुदतीत अर्ज सादर करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत पदवी प्रदान केली जाईल, असे डॉ. पाठक यांनी नमूद केले आहे.

विद्यापीठाचे आवाहन :  परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शासनाच्या धोरणास अनुसरून आणि वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचा विचार करून विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून माहिती दिली जाणार आहे. करोनाचा संसर्ग आणि टाळेबंदीच्या सध्याच्या परिस्थितीत परीक्षार्थीनी सध्याचे वास्तव्याचे ठिकाण सोडू नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी परीक्षेची तयारी करावी. परीक्षा संदर्भात आवश्यक सुचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी इतर माध्यमातून येणाऱ्या सुचना आणि माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.