अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात

नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या मोकळ्या भूखंडावर वापरात नसलेले टायर काही जणांनी जाळल्यानंतर वेळीच ते विझविण्यात न आल्याने आग पसरत गेली. धुराचे लोट दिसून लागल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी अग्निशमन दलास कळविले. अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली.

पाथर्डी फाटा परिसरात हॉटेल संतोष कॅफे आहे. या हॉटेललगत मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर काही जणांनी नको असलेले सामान, मंगल कार्यालयात सजावटीसाठी वापरण्यात येणारे सामान, फेकून देता येतील कसे कपडे, अन्य लाकडी साहित्य, दुचाकी-चारचाकी वाहनांचे वापरात नसलेले टायर फेकून दिलेले होते. मोकळ्या जागेतील हा कचरा कोणी तरी बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पेटवून दिला. वाऱ्याने ही आग पसरत गेल्याने भूखंडावर असलेला सर्व कचरा भक्ष्यस्थानी पडला. वेगाने आगीचे लोळ पसरू लागल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच तातडीने सिडको येथील अग्निशमन विभागाला याविषयी माहिती देण्यात आली. अग्निशमन बंब दाखल होताच आग विझवण्यास सुरुवात झाली. आगीची तीव्रता पाहता पुन्हा एक बंब मागविण्यात आला. साधारणत अडीच तासांहून अधिक काळ आग विझवण्याचे काम सुरू राहिले. दरम्यान, आग लागली की लावली याविषयी साशंकता व्यक्त होत आहे. टायर जळल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. या संदर्भात इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.