पाच तासानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी

इगतपुरी : तालुक्यातील पिंपळगाव भटाटा शिवारातील गांगडवाडी येथे कुत्र्यामागे धावताना घरात अडकलेल्या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त केली. अखेर पाच तासानंतर घराच्या दरवाजाला पिंजरा लावून बिबटय़ाला अडकविण्यात आले. बिबटय़ा पिंजऱ्यात अडकताच वन विभागाने आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मंगळवारी वैतरणा मार्गावरील पिंपळगाव भटाटा हद्दीतील गांगडवाडी येथे दुपारी दोनच्या सुमारास कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात कुत्र्याच्या मागे धावत असताना बिबटय़ा दरवाजा उघडा असलेल्या गोविंद हिंदोळे यांच्या  घरात शिरला. त्यावेळी घरात कोणी नव्हते. हिंदोळे हे घराबाहेर बसलेले होते. बिबटय़ा घरात गेल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत दार लावून घेतले. त्यामुळे बिबटय़ा घरातच अडकला. यादरम्यान कुत्रा मात्र  दरवाजाला असलेल्या फटीतून अलगद निसटला.

बिबटय़ा घरात अडकल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर बिबटय़ाला पिंजऱ्यात अडकविण्यासाठी पथक घटनास्थळी आले. पथकाकडून अनेक मार्गानी प्रयत्न करण्यात आले. परंतु, अडथळे निर्माण होत होते. त्यातच सायंकाळ झाल्याने अंधारामुळे समस्या अधिकच बिकट झाली. अखेर, घराच्या दरवाजालाच पिंजरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. घरात फटाके फेकून बिबटय़ाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. अखेर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिथरलेला बिबटय़ा घरातून बाहेर येण्याच्या प्रयत्नात पिंजऱ्यात अडकला. सलग पाच तास ही मोहीम सुरू होती.

या मोहिमेत जिल्ह्याचे सहायक वनसंरक्षक पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन  मार्गदर्शन केले. इगतपुरीचे वनअधिकारी रमेश ढोमसे, वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, दत्तू ढोन्नर, वनरक्षक जाधव, मनीषा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

या प्रकाराने कु त्र्याचा चाणाक्षपणा सर्वांना दिसला. बिबटय़ाला कुत्र्याच्या शिकारीचा हव्यास महागात पडला. कुत्र्याच्या मागे धावताना तो घरात फसला. बिबटय़ाला हुलकावणी देत कुत्रा मात्र घराबाहेर निसटला.

पिंपळगाव भटाटा परिसरात घरात शिरलेला दीड ते दोन वर्षांचा बिबटय़ा पकडला गेला असला तरी परिसरात बिबटय़ाची मादी असल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त के ली आहे. वन विभागाने या भागावर लक्ष केंद्रित करून पुढील होणाऱ्या संकटाना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी स्थानिकांच्या वतीने केली जात आहे.