नाशिक-मुंबई-पुणे सुवर्ण त्रिकोणात नाशिकचे स्थान ठळकपणे अधोरेखित होत असताना शहर विकासाला पर्यटनाच्या दृष्टीने चालना मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न होत आहेत. मात्र शहराचा इतिहास सांगणाऱ्या गड-किल्ल्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून ही उणीव भरून काढण्यासाठी दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. प्रतिष्ठानने जिल्हातील निवडक गड-किल्ल्यांची माहिती देणारी दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. तसेच, जिल्ह्यात शालेय पातळीवर तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना या अमूल्य ठेव्याची माहिती व्हावी यासाठी ‘किल्ला दर्शन’ बस सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
जिल्ह्यात शिवकालीन, पेशवेकालीन विविध शैलीतील ६८ किल्ले आहेत. जैवविविधतेने नटलेल्या किल्ल्यांकडे प्रशासनासह वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. या किल्ल्यांना पुनर्वैभव प्राप्त व्हावे, यासाठी दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान तसेच काही सामाजिक संस्था प्रयत्नरत आहेत. आतापर्यंत २५ गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम वेळोवेळी राबविली जात आहे. इतिहासाचा हा अमूल्य ठेवा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा, पर्यटकांनाही या ठेव्याची माहिती व्हावी, इतिहास कळावा यासाठी प्रा. बोरा यांच्या संकल्पनेतून प्रथमच जिल्ह्यातील किल्ला विषयक दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. प्रतिष्ठानने यातील १२ किल्ल्यांची निवड केली. दिनदर्शिकेत शिवाजी महाराजांनी शेवटच्या दिवसात विश्रांती घेतलेला विश्रामगड, टेहरी, साल्हेर, रांजनगड, वाघेरा, मुल्हेर, श्रीगड, हरिहर, कळसुबाई शिखर, भास्कर गड, रामशेज किल्ला, शैराई पाली यांची सचित्र माहिती देण्यात आली आहे.
किल्ल्याचा इतिहास, किल्ल्यावर असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती, तिथपर्यंत कसे जायचे, काय पाहायचे, किल्ल्यांची दुरवस्था तसेच किल्ल्यावरील अडचणी याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. ही दिनदर्शिका शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालयांना मोफत वितरीत केली जाणार आहे. दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ इतिहासप्रेमी पांडुरंग पाटील, पक्षिमित्र दिगंबर गाडगीळ, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा आदी उपस्थित होते.
किल्लेदर्शन बससेवा लवकरच
प्रतिष्ठानच्या वतीने पर्यटकांना येथील गड-किल्ल्यांची माहिती व्हावी, विद्यार्थ्यांपर्यंत हा इतिहास पोहचावा यासाठी जिल्ह्यातील विविध किल्ल्यांवर विद्यार्थी तसेच पर्यटकांच्या सहली काढल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पर्यटक तसेच विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी नाशिक दर्शन बस प्रमाणे नाशिक किल्ला दर्शन बस सुरू करावी याचे नियोजन सुरू असून राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभागासोबत याबाबत लवकरच चर्चा करण्यात येणार असल्याचे प्रा. बोरा यांनी सांगितले. दिनदर्शिकेसाठी इच्छुक पर्यावरणप्रेमींनी प्रा. बोरा (९८२२२ ८६७५०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.