न्यायालय, पोलीस ठाणे, तहसिलदार कार्यालय येथे भामटेगिरी

तुमच्या नावाचा आदेश आहे. तुम्ही न्यायालयात हजर न झाल्यास तुम्हाला अटक होईल, अशी थाप मारत आदेश रद्द करायचा असल्यास पैसे मोजावे लागतील, असे सांगून काही लोकांकडून

तीन हजार, तर काही जणांकडून दोन हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसालायेवला शहर पोलिसांनी बेडय़ा घातल्या.

येवल्याजवळील बदापूर येथील संशयित विवेक देवढे (२४) हा येवला न्यायालय, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आदी महत्वाच्या ठिकाणी आपल्या ओळखीचा फायदा घेऊन भामटेगिरी करीत असे. अशा पद्धतीने त्याने अनेकांना फसविले. शहरातील तक्रारदार सोमनाथ शिंदे यांच्या विरोधात येवला न्यायालयातून एक वॉरंट निघाले. त्या वारंटचे छायाचित्र काढून संशयित देवढेने शिंदे याना नेहमीच्या पद्धतीने संपर्क साधला. तुझ्या नावाने वॉरंट निघाले असून ते रद्द करण्यासाठी दोन हजार रूपये लागतील, असे सांगितले. शिंदे यास संशय आल्याने त्याने त्वरित येवला शहर पोलिसांशी संपर्क साधला. त्यामुळे या तोतया पोलीस  म्हणून मिरवणाऱ्या देवढेचे बिंग फुटले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले

दरम्यान, संशयित देवढे यास पोलीस ठाण्यात आणले असता आपल्यावर कोण गुन्हा दाखल करतो ते पाहतो. माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत. माझे कोणी काहीही वाकड करू शकत नाही, अशी त्याने पोलिसांनाच दमबाजी केली.देवढे हा बदापूर या आपल्या गावातील लोकांनाही पोलीस म्हणून फसवीत असे.येवला न्यायालयाच्या आवारातून त्याने परिसरातील काही व्यक्तींच्या नावे आलेल्या वारंटचे आपल्या भ्रमणध्वनीत फोटो काढून परस्पर ज्यांच्या नावे वारंट आहे त्यांच्याशी संपर्क करून वारंट रद्द करण्यासाठी पैशांची मागणी करीत असे.