भाजीपाला व्यापारी, हॉटेल व्यावसायिक बाधित झाल्याने बाजार समिती बंद

नाशिक : मालेगाव, नाशिक ग्रामीणच्या पाठोपाठ नाशिक शहरातही करोनाचा आलेख उंचावत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात करोनाचे नवीन ११ रुग्ण आढळले. यात उल्हासनगर येथे वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या महिलेचा समावेश आहे. तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत व्यापारी आणि हॉटेल चालकाचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे बाजार समिती पुढील तीन दिवस बंद ठेवली जाणार आहे. नाशिक शहरातील रुग्णसंख्या शंभरीच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. जिल्ह्य़ाची आकडेवारी एक हजाराच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

जिल्ह्य़ात आतापर्यंत करोनाचे एकूण ९६५ रुग्ण आढळले आहेत. यातील ६९७ मालेगावमधील तर १३२ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. नाशिक शहरात रुग्णांची संख्या ९९ वर पोहचली आहे. आतापर्यंत ७२० जण बरे होऊन घरी परतले. तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. टाळेबंदी शिथील झाल्यानंतर बाजारपेठांसह इतरत्र खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. याच सुमारास शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी करोनाचे ११ रुग्ण आढळले. यात आठ जण नवीन रुग्ण आहेत. नाशिकरोडच्या आशीर्वाद बस थांबा परिसरातील ६५ वर्षांच्या व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला.  जेलरोड येथील ४५ वर्षांची महिला वडिलांच्या अंत्यविधीसाठी उल्हासनगरला गेली होती. या महिलेला करोनाचा प्रादुर्भाव झाला. क्रांतीनगर येथील २३ वर्षांचा युवक बाजार समितीत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार करायचा. त्याचा अहवाल सकारात्मक आल्याने व्यापाऱ्यांसह खरेदीदार ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. कॉलेज रोडवरील विसे मळा भागातील रहिवासी असणारे करोनाबाधित पोलीस मालेगाव येथे तैनात होते. त्यांच्या कुटुंबातील ३९ वर्षांची महिला, दोन मुली आणि एक मुलगा असा चार जणांचा अहवाल सकारात्मक आला आहे.

पेठरोडच्या रामनगर येथील करोनाबाधित रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या रुग्णाच्या पत्नीचा अहवाल सकारात्मक आला आहे. मालेगाव येथे आरोग्यसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या गोविंदनगर येथील ३० वर्षांच्या व्यक्तीला प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले. वडाळाच्या मुमताजनगर येथील १५ वर्षांच्या रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या निवासस्थानाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

आदल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री १५ जणांचे अहवाल सकारात्मक आले. यामध्ये बाजार समितीत नियमित येणे-जाणे करणाऱ्या पंचवटीतील हॉटेल व्यावसायिक, मुमताज नगर येथील पाच व्यक्ती, संजीवनगर येथील मयत करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील तीन जण, महाराणा प्रताप चौकातील सिडको येथील रुग्णाच्या कुटुंबातील तीन महिला आणि एक वयोवृध्द व्यक्ती यांचा समावेश आहे. मालेगाव येथे सात दिवस कार्यरत राहिलेल्या गोविंदनगर येथील डॉक्टरचा अहवाल सकारात्मक आला.

बाजार समितीत तीन दिवस लिलाव बंद

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत व्यापारी आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिक यांचे अहवाल सकारात्मक आल्याच्या पार्श्वभूमीवर, बाजार समितीने २६ ते २८ मे या कालावधीत पंचवटी बाजार समिती आणि शरदचंद्र पवार बाजारात लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत बाजार समितीच्या आवारात औषध फवारणीचे काम करून स्वच्छता केली जाणार आहे. ज्या व्यापाऱ्याचा अहवाल सकारात्मक आला तो भाजीपाला खरेदी करून मुंबईला पाठवत असे. तसेच बाजार समितीच्या आवारात हॉटेल असणारा व्यक्ती काही दिवसांपूर्वी अनेकांच्या संपर्कात आला होता. पंचवटी बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव होतात. तर पेठ रस्त्यावरील समितीत फळ, धान्याचे लिलाव होतात. या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. करोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच बाजार समितीच्या आवारात निर्जुतुकीकरणाचे काम करण्यात येणार असल्याचे बाजार समितीने म्हटले आहे.