नवरदेवाचा मोठा भाऊ करोनाबाधित

नाशिक : करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लग्नाच्या रेशीमगाठी मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत बांधल्या जात आहेत. त्यातही कोणी करोनाग्रस्त असेल तर, गोंधळ उडणारच. पळसे परिसरातील कारखाना रोड येथे गुरूवारी झालेल्या लग्न सोहळ्यात हेच घडले. नवरदेवाच्या मोठय़ा भावाला करोना असल्याचा अहवाल प्राप्त होताच वरपक्षाकडील मंडळींनी सप्तपदीचे विधी पूर्ण करत लग्न मंडपातून नवरीला सोबत न घेताच काढता पाय घेतला.

शिलापूर येथील युवकाचे नाशिकरोड जवळील पळसे परिसरातील कारखाना रोड परिसरात राहणाऱ्या युवतीसोबत लग्न ठरले. गुरूवारी विवाह असल्याने बुधवारीच वऱ्हाडी मंडळी वधू पक्षाच्या घरी दाखल झाली. मुलीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू असतांना नवरदेवाच्या मोठय़ा भावाला करोना झाल्याचा अहवाल मिळाल्याने वऱ्हाडी मंडळींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. वऱ्हाडी मंडळींमधील काहींनी तेथून काढता पाय घेतला. परंतु, हळदीचा कार्यक्रम सुरू झाल्याने लग्न पुढे ढकलणे योग्य नाही, अशी चर्चाही झाली. नवरदेव सातत्याने भावाच्या संपर्कात असल्याने त्यालाही विलग व्हावे लागणार होते.

यामुळे गुरूवारी सकाळी अवघ्या पाच ते सहा लोकांच्या उपस्थितीत  लग्नविधी पूूर्ण झाला. त्यानंतर वधूला बरोबर न घेताच नवरदेव आपल्या घरी परतला. नवरदेवाच्या भावाचा अहवाल सकारात्मक आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून करोनाबाधित रुग्णांच्या अतिसंपर्कातील तसेच अन्य लोकांची माहिती संकलित करण्याचे काम वैद्यकीय पथक, पोलीस, प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.