खगोलप्रेमींसह विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन

खगोलप्रेमींसह सर्वासाठी उत्सुकतेचा विषय असलेले ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण पाहण्यासाठी नाशिककरांनी सकाळपासून ठिकठिकाणी गर्दी केली होती. काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण गुरुवारी नसल्याने खगोलप्रेमींना ग्रहण व्यवस्थित पाहता आले. नाशिकमधून हे ग्रहण खग्रास दिसले. ग्रहणाविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत यासाठी खगोलप्रेमी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. दुसरीकडे, धार्मिक परंपरेनुसार ग्रहण काळात अनेकांनी गोदावरीत स्नान केले. ग्रहणाच्या वेळेत गोदाकाठावरील बहुतांश मंदिरे बंद ठेवण्यात आली होती.

या वर्षांतील अखेरचे सूर्यग्रहण गुरुवारी सकाळी आठ ते ११ या वेळेत झाले. सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी ग्रहणास सुरुवात झाली. नऊ वाजून २३ मिनिटे झाली असतांना म्हणजे ग्रहणाच्या मध्यावर सूर्याचा ७३ टक्के भाग हा झाकला गेला. तर १० वाजून ५८ मिनिटांना ग्रहण समाप्त झाले. नागरिकांनी सौर चष्मा, काळा गॉगल किंवा अन्य साधनांच्या मदतीने अवकाशात सुरू असलेल्या ‘सावल्यांच्या खेळाची’ मजा लुटली. शाळांमध्ये खगोलप्रेमींच्या मदतीने ग्रहण कसे पाहावे, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. काही ठिकाणी याविषयी माहिती देण्यात आली. ग्रहणाप्रसंगी काहींनी गोदाकाठ गाठत स्नान केले. गुरुवारी सकाळी ग्रहण लागले असले तरी बुधवारी सायंकाळपासून ग्रहणाचे वेध लागले होते. त्यामुळे या काळात गोदाकाठावरील मंदिरे बंद राहिल्याचे  गोदा पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले. नदीला पुरेशा प्रमाणात पाणी सोडलेले नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याचे शुक्ल यांनी नमूद केले.

खगोल मंडळातर्फे ग्रहणदर्शनाची व्यवस्था

खगोल मंडळातर्फे आकाशवाणी येथील जॉगिंग ट्रॅक येथे ग्रहण पाहण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. यात ४५० हून अधिक खगोलप्रेमींनी सहभाग घेतला. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. प्रदीप देवी, श्यामकांत आचार्य यांनी उपस्थितांना ग्रहणाची शास्त्रीय माहिती सांगितली. डॉ. गिरीश पिंपळे यांनी चाळणीद्वारे ग्रहण कसे बघावे, याचे प्रात्यक्षिक दाखविले. क्षितिज गाडगीळ, सई जोशी, सोहम चव्हाण, वरद जाऊकर या मुलांनी स्वत खोक्याच्या साहाय्याने तयार केलेल्या पिनहोल कॅमेऱ्यातून ग्रहण दाखवले. याशिवाय ग्रहणविषयक पत्रकांमधून सूर्यग्रहण ही खगोलीय घटना नेमकी कशी घडते, हेही दाखविण्यात आले. सोबतच जमलेल्या सर्व खगोलप्रेमींना चॉकलेट देत ग्रहण काळात काही खाऊ नये, हा समज कसा चुकीचा आहे, हे पटवून देण्यात आल्याचे आशीष चव्हाण यांनी सांगितले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला विरोध

ग्रहणाविषयी नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हावेत, याकरिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सौर चष्मे वितरित करण्यात आले. तसेच ग्रहणात पाणी पिऊ नये, अन्न खाऊ नये, काही चिरू नये अशा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गोदाकाठावर महाअंनिसच्या महिला कार्यकर्त्यांनी भाजी कापून दाखविली. काहींनी ग्रहण पाहत असतांना अन्न आणि पाणी सेवन केले. या प्रकाराला एका महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रहण पाहणाऱ्या नागरिकांनीच महिलेची समजूत काढत या अंधश्रद्धा दूर होणे गरजेचे असल्याचे सांगितल्यानंतर ती निघून गेली. अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, कृष्णा चांदगुडे यांनी सौर चष्म्याच्या मदतीने ग्रहण कसे पाहावे, याविषयी मार्गदर्शन केले.