उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा

नाशिक : करोनाच्या संकटात उद्योगांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाय योजना केल्या. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे करोना काळात उद्योग १०० टक्के सुरू राहिले. त्यामुळे कोटय़वधी कामगारांचा रोजगार वाचला. बेकारीचे संकट ओढवले नाही, असा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी के ला.

बुधवारी अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात देसाई यांनी भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी इतर राज्यातील उद्योग अडखळत असल्याचे नमूद केले.

एप्रिल २०२० मध्ये महाराष्ट्राने उद्योगांतील उत्पादन प्रक्रिया सुरळीत राखण्यासाठी उपाययोजना केल्या. मुख्यमंत्र्यांनी उद्योगांसाठी कृती दलाची स्थापना केली आहे. कामगारांचे लसीकरण, उद्योगांना देण्यात येणाऱ्या सुविधांवर नियमित आढावा घेतला जात आहे. लहान उद्योगांसमोर अडचणी आहेत. केंद्र सरकारच्या पॅकेजमधून त्यांना लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत रिलायन्सचा औषध निर्मितीचा मोठा प्रकल्प येत आहे. तिथे लस निर्मिती करावी, अशी मागणी केली जाणार आहे.

महाविकास आघाडीत सुरू असलेल्या संघर्षांचा सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होणार नाही. हे सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाळत प्रकरणाबाबत शिवसेनेचे खासदार वाचा फोडत आहे. विरोधकांवर पाळत ठेवणाऱ्यांचा समाचार घेतला जाईल. पांजरपोळच्या जागेवर उद्योग उभारणीचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. ज्यावेळी तो येईल तेव्हा बोलता येईल असे देसाई यांनी सांगितले.

‘छावा’ संघटनेकडून उद्योजकांना त्रास

अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकाऱ्यांना छावा या राजकीय संघटनेकडून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची तक्रार आयमा या उद्योजकांच्या संघटनेकडून करण्यात आली. उद्योजकांच्या प्रश्नांबाबतचे निवेदन आयमाचे धनंजय बेळे, निखील पांचाल, ललित बुब, राजेंद्र अहिरे यांच्याकडून उद्योगमंत्र्यांना देण्यात आले. करोना काळात औद्योगिक वसाहत व उद्योजकांचे अनेक प्रश्न रखडले. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प, सार्वजनिक प्रसाधनगृहाची व्यवस्था, पांजरपोळची जागा ताब्यात घेऊन उद्योजकांना द्यावी, इंडिया बुल्सचा प्रश्न, अंबड औद्योगिक क्षेत्रातील इमारतीतील गाळे विक्रीचे धोरण लवचिक करावे, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.