News Flash

घरफोडी, चोरीचे सत्र कायम ; विविध घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

अन्य वेगवेगळ्य़ा ठिकाणी झालेल्या तीन घटनांमध्ये चोरटय़ांनी सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

नाशिक : शहरात चोरी, घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या चार घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. गजबजलेल्या एन. डी. पटेल रस्ता परिसरातील घरफोडीत चोरटय़ांनी सुमारे १८ लाखांचा ऐवज चोरला. चोरीच्या अन्य घटनांमध्ये तीन लाखांचा ऐवज चोरण्यात आला.

शहरातील मध्यवर्ती भागात घरफोडी झाली. याबाबत प्रितपालसिंग बग्गा यांनी तक्रार दिली. एन. डी. पटेल रस्त्यावरील भाजप कार्यालयाशेजारी बग्गा यांचा बंगला आहे. बग्गा कुटुंबीय काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले असताना चोरी झाली. चोरटय़ांनी बंद बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तिजोरी फोडून सात लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे १७ लाख ४८ हजार ६२५ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसी टीव्ही चित्रणाच्या आधारे चोरटय़ांचा माग काढला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. चोरीचे सत्र कमी होण्यास तयार नाही.

अन्य वेगवेगळ्य़ा ठिकाणी झालेल्या तीन घटनांमध्ये चोरटय़ांनी सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

पहिली घटना आडगाव नाका परिसरातील स्वामी नारायण मंगल कार्यालयाच्या आवारात घडली. याबाबत सासवड येथील शिक्षक संतोष झिंझुरके यांनी तक्रार दिली. झिंझुरके हे शाळेतील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी घेऊन आले होते. स्वामी नारायण ट्रस्टच्या शाळेत राज्यस्तरीय स्पर्धा असल्याने शिक्षकांसह खेळाडू परिसरातील स्वामी नारायण मंगल कार्यालयात मुक्कामी थांबले होते. कार्यालय आवारातील नळावर शिक्षक आंघोळीसाठी गेले असता बाजूला काढून ठेवलेली त्यांची पॅण्ट चोरटय़ांनी पळवून नेली. पॅण्टमध्ये ५० हजाराची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट होते. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत जुने सामनगाव परिसरात चोरटय़ांनी घरात शिरून चोरी केली. तुकाराम जगताप यांनी तक्रार दिली. चोरटय़ांनी बंद घराचा दरवाजा उघडून कपाटात ठेवलेली एक लाख ३५ हजारांची रोकड लंपास केली. नंतर चोरटय़ांनी आपला मोर्चा परिसरात राहणारे रमेश घुगे यांच्या मालमोटारीकडे वळवीत दोन बॅटऱ्या चोरून नेल्या. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये उंटवाडीत घडलेल्या चोरीच्या घटनेबद्दल मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मल्हारी शिंदे यांनी तक्रार दिली. मॅग्मोप्रकाश सोसायटीत ते राहतात. चोरटय़ांनी शिंदे यांच्या घरातून सोन्याच्या बांगडय़ा आणि ब्रेसलेट असा सुमारे एक लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 3:28 am

Web Title: housebreaking cases continues in nashik zws 70
Next Stories
1 आवक घटल्याने कांदा सात हजार पार
2 नाशिकमध्ये ‘महाआघाडी’चा प्रयोग फसला
3 महाआघाडीतील बिघाडीवरून आरोप-प्रत्यारोप
Just Now!
X