• गोदावरी काठ परिसरात सर्वत्र चिखल
  • पाण्याचा जोर ओसरला

सात वर्षांच्या कालखंडानंतर महापुराला तोंड देणाऱ्या नाशिकमध्ये बुधवारी या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या कोटय़वधींच्या नुकसानीचे भयावह स्वरूप समोर आले. निवासी वसाहती, बाजारपेठेतील दुकाने, रस्ते आदी परिसरांत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते. नैसर्गिक आपत्तीचा तडाखा इतका जबरदस्त होता की, काही ठिकाणी रस्ता व पूल यांना जोडणाऱ्या भागात भलेमोठ्ठे खड्डे पडले. शहरातील अनेक रस्ते व चौकांची यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. पावसाने काहीशी उघडीप घेतल्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी शहरवासीयांची धडपड सुरू झाली. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे गंगापूर धरणातील विसर्ग कमी झाला. यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

सलग १५ तास झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक शहर व परिसर जलमय झाला. नदीकाठालगतचीच नव्हे, तर सखल भागातील घरे व दुकाने पाण्याखाली बुडाली. धरण क्षेत्रात आणि खालील भागात पाऊस झाल्यामुळे गंगापूरमधून ४२ हजार क्युसेस पाणी सोडले गेले होते. मध्यरात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने धरणातील विसर्ग सात हजार क्युसेसवर आला. यामुळे धोक्याच्या पातळीवर वाहणाऱ्या गोदावरीचा प्रवाह बऱ्याच अंशी कमी झाला. गोदावरी, नासर्डी या नदीकाठालगतच्या भागातील वसाहती, बाजार पेठेतील दुकाने, रस्ते व चौक सर्व चिखलमय झाले होते. दुकानांमधील साहित्य पुरात वाहून गेले. जे साहित्य वाचले, ते भिजल्याने निकामी झाले. नदी काठालगतच्या निवासी वसाहतींमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. सर्वत्र गाळ असल्याने भांडी बाजार, सराफ बाजार, दहीपूल बाजारपेठेतील व्यवहार ठप्प राहिले. दुकानांमधील गाळ काढण्याची मोहीम सर्वत्र सुरू होती. रस्तेही चिखलमय असल्याने या परिसरातील वाहतूक धोकादायक झाली होती.

लहान-मोठय़ा रस्त्यांची पावसाने दैनावस्था केली. होरायझन स्कूलसमोरून मखमलाबादकडे जाणाऱ्या मार्गावर गोदावरीवर पूल आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्याचा पुलाला जोडणारा भाग खचला. यामुळे या मार्गावरील चारचाकी वाहनांची वाहतूक बंद पडली. अनेक रस्ते व चौक याच प्रकारे खचले होते. काही ठिकाणी मोठे खड्डे पडले. अनेक ठिकाणी वीज खांब भुईसपाट झाले. नदी काठ व पुलांवर पुरात वाहून आलेल्या सामग्रीने या आपत्तीचे भीषण स्वरूप अधोरेखित केले. झोपडपट्टी व सखल भागात राहणाऱ्या अनेकांचे संसार उघडय़ावर आले. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले. धरणांमधील विसर्गही कमी झाला. गंगापूरमधून सात हजार क्युसेस, दारणा धरणातून ३४ हजार, पालखेड ९ हजार, कडवा ७८०० आणि वालदेवी धरणातून १०५० क्युसेस पाणी सोडण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे गोदावरीची पातळीही कमी झाली.