जवान चंदू चव्हाणचे धुळ्यात उत्साहात स्वागत

पाकिस्तानातून परतलेला जवान चंदू चव्हाणने वरिष्ठांशी झालेल्या मतभेदातून सीमा ओलांडली होती की, नकळत तो शत्रूच्या हद्दीत पोहोचला, या बाबतची पहिल्या टप्प्यातील चौकशी पूर्ण झाली आहे. त्यानंतर शनिवारी धुळे येथे आपल्या गावी परतलेल्या चंदूचे अभूतपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आले. महिनाभराच्या सुटीनंतर त्याला दुसऱ्या टप्प्यातील लष्करी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यावेळी चंदूचे लष्करातील भवितव्य निश्चित होईल. अपवादात्मक स्थितीत कठोर कारवाईऐवजी चंदूला स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय उपलब्ध केला जाऊ शकतो, असे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सुमारे चार महिन्यांच्या कालावधीनंतर पाकच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेल्या जवान चंदूची भारतीय लष्कर व गुप्तचर यंत्रणांनी सखोल चौकशी केली. भारताने पाकव्याप्त लष्करी तळांवर हल्ला चढविण्याची वेळ आणि त्याची सीमा ओलांडण्याची वेळ एकच ठरली. अर्थात सीमा ओलांडण्यामागे वरिष्ठांशी झालेल्या मतभेदातून संतापात तडकाफडकी त्याने ही कृती केल्याचे प्रारंभापासून सांगितले जाते. पहिल्या टप्प्यातील चौकशीत पाकिस्तानमध्ये कुठे वास्तव्यास होता, तिथे काय घडले याची माहिती संकलित करण्याबरोबर सीमा ओलांडण्यामागील कारणही जाणून घेण्यात आले. त्याची ही कृती जाणूनबुजून होती की नकळत, याची पडताळणी करण्यात आली. चंदूची चौकशी होण्याआधी त्याच्या तुकडीतील अधिकारी व इतरांची चौकशी झाली आहे. पहिल्या टप्प्यातील चौकशीचे निष्कर्ष अद्याप गुलदस्त्यात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते सीमा ओलांडण्याची कृती चुकीने घडली तरी अथवा जाणूनबुजून केली असेल तरीही चंदूवर कारवाईची टांगती तलवार आहे. सीमावर्ती भागात कार्यरत जवानांना नियमांचे पालन अधिक सजगपणे करावे लागते. ‘मॅन्युअल ऑफ इंडियन मिल्रिटी लॉ’ आणि ‘डिफेन्स सव्‍‌र्हिसेस रुल्स’ या पुस्तकांत नियमांची भरभक्कम चौकट नमूद आहे. तसेच सीमावर्ती भागात तैनात लष्करी तुकडय़ांच्या दैनंदिन कामासाठी प्रमाणित प्रणालीचा (एसओपी) वापर करावा लागतो. समोर शत्रू प्रदेश आहे हे ज्ञात असुनही आपली चौकी सोडून थेट त्या प्रदेशात शिरणे ही अक्षम्य स्वरुपातील कृती ठरते. लष्करातील शिस्त अबाधीत ठेवण्यासाठी चंदूची कारवाईतून सुटका होणार नसल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. लष्करात नियमांचे उल्लंघन होऊ नये याकरीता कठोर शिक्षेची तरतूद आहे. शत्रूसमोर जाणीवपूर्वक कोणाकडून अशी चूक घडल्यास ‘कोर्ट मार्शल’ अथवा ‘बडतर्फी’च्या कारवाईला सामोरे जावे लागते. चंदूच्या प्रकरणात मध्यमार्ग म्हणून स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय दिला जाऊ शकतो, याकडे काही अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. दुसऱ्या टप्प्यातील चौकशीअंती चंदूचे पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे.

पाक लष्कराकडून शारीरिक छळ

पाक लष्कराने शारीरिक छळ केला. तिथे दोन-तीन दिवस उपाशी ठेवले जायचे. वारंवार विशिष्ट स्वरुपाचे इंजेक्शन देण्यात आले. अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवले. जेव्हा कधी बाहेर काढले जाई, तेव्हा तोंडावर काळे फडके बांधण्यात येत असे.हे अनुभव चंदूने कुटुंबियांना कथन केले आहेत. चार महिने विचित्र स्थितीत काढल्याने त्याची ढासळलेली मानसिक स्थिती सुधारत आहे. घरी महिनाभर वास्तव्य केल्यानंतर आप्तस्वकीयांना भेटून मानसिक स्थिती अधिक चांगली होईल, असे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

भारतात परतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड

पाकिस्तानातून सुखरुप सुटका झालेला भारतीय जवान चंदू चव्हाणचे धुळे शहरासह बोरविहीर गावी अभूतपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी चंदूच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. चव्हाण यांच्या कुटुंबियांना आपण दिलेला शब्द पाळला असून पाकिस्तानच्या ताब्यातून सुखरुप सुटका होऊन चंदू आज घरी परत आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण आणि ढोल-ताश्यांच्या गजरात चंदूचे स्वागत करण्यात आले. होळी सणाच्या तोंडावर चंदू गावी परतला असल्याने बोर विहीर गावात रस्त्यावर सडा, रांगोळी काढण्यात आली. औक्षण करण्यासाठी महिलांनी गर्दी केली. चंदूला परत आणण्याचे श्रेय कुटुंबियांनी केंद्र सरकार आणि डॉ. भामरे यांचे असल्याचे सांगितले. भारतात परतल्यावर अद्याप विश्वास बसत नसल्याचे चंदूने सांगितले. पाकिस्तानात असताना लहानपणापासून आपला सांभाळ करणाऱ्या आजी-आजोबांची व कुटुंबियांची प्रकर्षांने आठवण आल्याची भावना त्याने व्यक्त केली. भारतात परतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड असल्याचे त्याने सांगितले.