१६३ बालकांचा मृत्यू, आदिवासीबहुल भागात प्रमाण जास्त

चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : माता-बाल मृत्यूवर नियंत्रण मिळविल्याचा दावा आरोग्य विभाग करत असला तरी राज्यात नाशिक जिल्ह्य़ात सर्वाधिक म्हणजे १६३ बालमृत्यू झाले आहेत. आदिवासीबहुल भागात हे प्रमाण सर्वाधिक असून उत्तर महाराष्टातही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती असल्याचे आरोग्य विभागाच्या ‘हेल्थ मॅनेजमेंट इनफॉर्मेशन सिस्टीम’ (एच.एम.आय.एस) यांच्या अहवालातून उघड झाले आहे.

आरोग्य विभाग मातृवंदन योजना, मानव विकास कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा योजना अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून माता-अर्भक-बाल मृत्यूवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहे. प्रत्यक्षात मात्र शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाही. लाभार्थीना योजनेची माहिती नसल्याने ते या उपक्रमांकडे सपशेल पाठ फिरवतात.

आदिवासी भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. आज आदिवासी पाडय़ावर रस्ता नसल्याने १०८ ही रुग्णवाहिका सेवा गावात पोहचत नाही, आदिवासी महिलांमध्ये रक्ताक्षय या आजाराचे प्रमाण अधिक असून रुग्णालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या पाहता घरीच प्रसुती होण्याकडे अनेकांचा कल आहे. आरोग्यविषयक सेवेचा लाभ घेण्यापेक्षा आदिवासी पाडय़ावर भगत, बुवा यांचा आधार घेतला जातो. आरोग्य सेवेतील विस्कळीतपणा आणि प्रशासनाची उदासिनता याचा विपरीत परिणाम आरोग्य विभागावर होत आहे. या पार्श्वभूमीवर, एच.एम.आय.एस. च्या सव्‍‌र्हेक्षणात राज्यातील ३५ जिल्ह्य़ांमध्ये बाल मृत्यू (शून्य ते सहा वर्ष वयोगट) मध्ये धुळे (९५), नंदुरबार (९३), जळगाव (६६) अशी संख्या आहे. अर्भक मृत्यू नाशिकमध्ये ६८४  झाले. उत्तर महाराष्ट्रात धुळे (३७१), नंदुरबार (५५७) आणि जळगाव (२३१) अशी आकडेवारी आहे.

माता आणि बालमृत्यू यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी गृहभेट, अंगणवाडीसेविका, आशासेविका यांच्याकडून गरोदर मातांची माहिती संकलित करण्यात येत आहे. प्रसूतीपूर्व काळात चार वेळा तरी त्या महिलेने सरकारी रुग्णालयाला भेट द्यावी यासाठी शिबिरे भरविण्यात येत आहेत. त्यांची नोंदणी करत हिमोग्लोबीन, सोनोग्राफी आदींकडे लक्ष केंद्रित करण्यात येते. ‘आरोग्य वर्धिनी’च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र आदिवासी भागात महिला याकडे दुर्लक्ष करतात. बहुतांश बाळ कमी वजनाचे, मुदतपूर्व जन्माला आले आहेत. यामुळे बालमृत्यूचा आकडा वाढतो.

-डॉ. रत्ना रावखंडे (आरोग्य उपसंचालक, नाशिक विभाग)