जळगावच्या मुलांनी, तर औरंगाबादच्या मुलींनी येथे आयोजित तीसऱ्या महाराष्ट्र राज्य फ्लोअरबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. राज्य आणि जिल्हा संघटना तसेच के. एन. डी. बहुउद्देशीय मंडळ, क्रीडा साधना या संघटनांच्या वतीने सिडको येथील छत्रपती संभाजी स्टेडियममध्ये या कनिष्ठ गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक नानासहेब महाले यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या स्पर्धेत मुलांच्या अंतिम लढतीत  जळगावने ठाण्याला पराभूत केले. पहिल्या सत्रात जळगावने दोन गोल, तर ठाण्याने एक गोल केला. दुसऱ्या सत्रात ठाण्याने गोल करून २-२ अशी बरोबरी आणि नंतर ३-२ अशी आघाडी घेतली. जळगावच्या खेळाडूंनी त्यानंतर जोरदार खेळ करून सलग तीन गोल करत सामना  ५-३ असा जिंकला. मुलींच्या अंतिम लढतीत औरंगाबादने जळगाववर ६-२ अशी मात केली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे, महाराष्ट्र फ्लोअरबॉल संघटनेचे सरचिटणीस रवींद्र चोथवे, रेफ्री मंडळाचे अध्यक्ष दीपक वाडे, दिलीप पाटील, नितीन हिंगमिरे आदी उपस्थित होते. यावेळी खरे यांनी या खेळात वापरला जाणारा चेंडू हॉकीतील चेंडूपेक्षा हलका असल्यामुळे वेगाने खेळल्यानंतरही यामध्ये दुखापत होत नाही. त्यामुळे या खेळाला चांगले भवितव्य आहे, असे सांगितले.