28 January 2021

News Flash

करोना आटोक्यात आल्याने बेरोजगारीचे सावट

महापालिकेतील हंगामी ५८२ डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञांसमोर संकट

(संग्रहित छायाचित्र)

महापालिकेतील हंगामी ५८२ डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञांसमोर संकट

नाशिक : करोना काळात अनेकांना रोजगार गमवावा लागला. याच सुमारास वैद्यकीय क्षेत्रातील घटकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. ही लढाई लढण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधतज्ज्ञ अशी ५८२ पदे तात्पुरत्या स्वरूपात तातडीने भरली गेली. सामूहिक प्रयत्नांनी करोना काही अंशी नियंत्रणात आला. या काळात मुदतवाढ न दिल्याने संबंधितांना

काही महिने मानधनाविना काम

करावे लागले. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे या हंगामी कर्मचाऱ्यांना आता कायमची सुट्टी देण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर केला जात आहे.

शहरात सध्या प्रतिदिन १०० ते  १५० नवीन करोनाबाधित रुग्ण सापडतात. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १११६ इतकी आहे. महिनाभरात करोनाचा आलेख हळूहळू खाली येत आहे. करोनाची संभाव्य दुसरी लाट येण्याची वर्तविली गेलेली शक्यता पुसट झाली. सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे पालिकेची करोना रुग्णालये, करोना काळजी केंद्रातील खाटा रिक्त होत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव जेव्हा वाढला, त्यावेळी पालिकेची रुग्णालये, काळजी केंद्रात रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नव्हते. मुळात महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करण्यास डॉक्टर तयार नसतात. करोनाचे संकट नसतानाही अनेकदा जाहिराती, भरमसाठ वेतनाची तयारी दर्शवूनही तज्ज्ञ डॉक्टर मिळाले नसल्याचा इतिहास आहे. करोनाच्या काळात मोठय़ा संख्येने वाढणाऱ्या रुग्णांवरील उपचारात अतिरिक्त वैद्यकीय मनुष्यबळ आवश्यक ठरले. महापालिकेने हंगामी तत्त्वावर डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध तज्ज्ञ आदी पदे भरली. तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर ही नियुक्ती झाली.

हंगामी कर्मचाऱ्यांनी करोना काळात मोलाची भूमिका बजावली. मध्यंतरी त्यांच्या हंगामी नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आला. त्यास मुदतवाढ न मिळाल्याने काही महिने त्यांच्यावर वेतनाविना काम करण्याची वेळ आली. महापालिकेसह शासनाच्या आरोग्य विभागात हंगामी नियुक्त वैद्यकीय घटकांचे वेतन रखडल्याचा विषय अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला गेला. त्यांनी करोना योद्धयांचे वेतन तातडीने देण्याचे निर्देश दिल्यावर प्रशासन जागे झाली. मुदतवाढीला मान्यता देत रखडलेल्या वेतनाचा विषय मार्गी लावला जात आहे. या ५८२ अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञांची मुदत जानेवारी अखेपर्यंत आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे रुग्णांची संख्या घटली आहे. पालिकेच्या रुग्णालय, केंद्रातही फारसे रुग्ण नाहीत. त्यामुळे जानेवारीनंतर हंगामी कर्मचाऱ्यांना कायमची सुट्टी देण्याचा विचार केला जात असल्याचे या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

करोनामुळे अनेकांना रोजगार गमवावे लागल्याची असंख्य उदाहरणे आहेत. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील काही घटकांवर ती वेळ आल्याचे या घटनाक्रमातून उघड होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2021 12:30 am

Web Title: job crisis in front of 582 temporary doctors nurses laboratory technicians due to corona control zws 70
Next Stories
1 चोरटय़ाचा प्रतिकार करताना रेल्वेतून पडून महिला जखमी
2 अडीच हजार नागरिकांची ‘सिरो’तपासणी
3 त्रुटींमुळे ‘फास्टॅग’ वापरास विरोध
Just Now!
X