जलमिलनावर शंकराचार्याचा आक्षेप

कुंभमेळ्यात कैलास मानसरोवरातून आणलेले जल आणि गोदावरीतील जल यांचा संगम साधण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृती धर्मविरोधी असल्याची तोफ शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी डागली. मुळात सिंहस्थात सर्व देवता व तीर्थ नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येतात. गोदावरी स्वत: परमपवित्र आहे. तिला कोणाची गरज नाही. तिचे जल अन्यत्र देण्याची गरज असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मानसरोवराचे जल कुशावर्तात टाकून गोदावरीचे महत्व कमी केल्याचा आरोप त्यांनी केला. भारताची जमीन गिळंकृत करणाऱ्या आणि देशाच्या अनेक प्रकल्पांत अडसर आणणाऱ्या चीनशी जल मिलनातून कोणती मैत्री साधली जाईल, असा प्रश्न शंकराचार्यानी उपस्थित केला.
त्र्यंबकच्या तिसऱ्या पर्वणीवेळी भारत-चीन संबंध दृढ व्हावेत, या उद्देशाने मुंबईतील चिनी दुतावास आणि ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशन यांच्यावतीने कुशावर्त तीर्थात कैलास मानसरोवराचे जल अर्पण करण्याचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला होता. यावेळी फडणवीस यांनी या माध्यमातून अनोखा संगम झाल्याचे सांगत कुंभमेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याचा उल्लेख केला होता. हा धागा पकडून शंकराचार्यानी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. गोदावरी सर्वोच्च असून तिला कोणाची गरज नाही. धर्मशास्त्रानुसार मुख्यमंत्र्यांची कृती चुकीची आहे. चीनने भारताची हजारो एकर जमीन बळकावली. भारताच्या अनेक प्रकल्पात त्याच्याकडून अवरोध आणले जातात. जल मिलनाद्वारे मैत्रीचा सेतू बांधण्याची पध्दत चुकीची असल्याचे ते म्हणाले. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मुद्यावर त्यांनी डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शासन जेरबंद करू शकत नसल्याचे सांगितले. एखादी व्यक्ती दोषी असेल तर त्यावरून संस्थेवर कारवाई करणे योग्य नाही. मात्र, ही संस्था लष्करी प्रशिक्षण व तत्सम बाबी करत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नसल्याचे त्यांनी सूचित केले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र शासनाने तातडीने जादुटोणा विरोधी कायदा मंजूर केला. मात्र, शासनाच्या अखत्यारीतील शिर्डीच्या साई संस्थानमार्फत अंधश्रध्दा पसरविली जात आहे. वेगवेगळ्या फलकांद्वारे शासन शिर्डीमध्ये अंधश्रध्देला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिर्डीचे साईबाबा आणि देवस्थान विरोधात केलेल्या विधानामुळे एका साईभक्ताने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिचा निकाल येण्याआधी संबंधितांकडून आपण त्या विधानांबाबत माफी मागितल्याचे पसरविण्यात आले. आपण आजही आपल्या विधानांवर ठाम असून माफी मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. देशातील कोणताही कुंभमेळा केवळ साधू-महंतांचा नाही. सनातन हिंदू धर्माला मानणाऱ्या प्रत्येकाचा आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज असून ग्यानदास यांनी त्यावर दावा करत संभ्रम निर्माण केल्याचेही शंकराचार्यानी नमूद केले.