कैलास जाधव यांनी पदभार स्वीकारला

नाशिक :  शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना यावर नियंत्रण मिळविण्याचे खरे आव्हान नवनियुक्त महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यासमोर आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी राधाकृष्ण गमे यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी त्यांनी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्यविषयक कामांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले.

शहरातील करोनाबाधितांची संख्या २२ हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असून यातील १८ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. सध्या तीन हजार रुग्ण उपचार घेत असून दररोज सरासरी ४०० ते ५०० नवे रुग्ण आढळत आहेत.  करोना काळात परिस्थिती हाताळणीवरून राज्यात अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या झाल्या. यात नाशिकचाही क्रमांक लागला. पालिका आयुक्त गमे यांची २० महिन्यांत बदली करण्यात आली. त्यांच्या जागी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. गमे यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपविली जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गमे यांना दुसरी जबाबदारी मिळाल्यानंतर जाधव हे आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील असे सांगितले जात होते. तथापि, बदलीचे आदेश मिळाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी जाधव यांनी महापालिकेत येऊन पदभार स्वीकारला.

करोना नियंत्रणासाठी महापालिकेची अवघी यंत्रणा प्रयत्नरत आहे. रुग्णांचा शोध घेण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सर्वत्र मोठय़ा प्रमाणात प्रतिजन चाचण्या केल्या जात आहेत. झोपडपट्टीकडून इमारती आणि कॉलनी क्षेत्राकडे करोनाचा प्रवास झाला. करोनामुळे आतापर्यंत ४६१ जणांचा मृत्यू झाला असून सध्या २८३५ रुग्ण उपचार घेत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक त्या उपाययोजना होत नाहीत. पालिकेच्या ऑनलाइन व्यवस्थेत रुग्णालयांमध्ये खाटा रिक्त दिसतात. प्रत्यक्षात त्या रुग्णांना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या खाटांची कमतरता आहे. महापालिकेने कंत्राटी स्वरूपात नव्याने नियुक्त केलेले काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामावर येण्याकडे पाठ फिरवली आहे. या एकंदर वातावरणात आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जाधव यांना प्रथम करोना विरोधातील लढाईला वेग द्यावा लागणार आहे. जाधव यांनी पूर्वी नाशिकमध्ये काम केलेले आहे. निफाडचे प्रांताधिकारी, २००३-०४ मधील सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. स्थानिक प्रश्नांची आपणास बऱ्यापैकी माहिती आहे. सर्वाना सोबत घेऊन समन्वयाने काम केले जाईल, असे जाधव यांनी सांगितले.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्यविषयक कामांना प्राधान्य दिले जाईल. शहरात अनेक प्रकल्प सध्या सुरू आहेत. ते वेगाने पूर्ण करण्यात येतील. मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे हे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांनी शहर विकासासाठी राबविलेले प्रकल्प पुढे नेले जातील.

– कैलास जाधव, महापालिका आयुक्त