यंत्रणा सक्षमीकरण कामामुळे अजून १५ दिवस समस्या कायम

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अंतर्गत असलेल्या  धुळे येथील ४००/२२० केव्ही क्षमतेच्या उपकेंद्रातील ३१५ केव्हीच्या रोहित्रांची क्षमता वाढविण्याचे आणि यंत्रणा दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील कळवण आणि देवळा या दोन तालुक्यातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहेत.  हे काम अजून १५ दिवस सुरू राहणार असल्याने ग्राहकांनी सहकार्य करावे, असे महावितरणने म्हटले आहे.

महापारेषणची यंत्रणा सक्षमीकरण काम सुरू असल्याने त्याचा अतिरिक्त वीजभार, अतिरिक्त दाब धुळे उपकेंद्रातील इतर रोहित्रांवर पडत असून त्यामुळे या उपकेंद्रअंतर्गत येत असलेल्या महावितरणच्या मालेगाव मंडळातील कळवण आणि देवळा  तालुक्यातील ग्राहकांना विजेची कमी दाबाची  समस्या निर्माण होत आहे. पर्यायी व्यवस्था करून योग्य दाबाने आणि अखंडित वीज पुरवठा देण्याचे प्रयत्न सुरू असून महापारेषणचे संबंधित कार्य जवळपास १५ दिवसांपर्यंत  चालणार असल्यामुळे ग्राहकांनी या काळात सहकार्य करण्याचे आवाहन कळवण  विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रनाथ भोये यांनी केले आहे.

देवळा तालुक्यातील ३३/११ के.व्ही उपकेंद्र देवळा, ठेंगोडा, दहीवड, खर्डा, खामखेडा, भऊर येथील वाहिनीवरील रामेश्वर, लोहणेर, ठेंगोडा, वाजगाव, खर्डा, मटाने, सरस्वतीवाडी, विठ्ठल वाडी, मेशी या गावासह  तसेच कळवण तालुक्यातील ३३/११ के.व्ही उपकेंद्र जयदर, चणकापूर, निवाणे, बेज, नांदुरी, पाळे, ओतूर, अभोणा, दळवट येथील वाहिनीवरील करमाळे, वरखेडा , कनाशी, जयदर, सुळे, पिंपळे, दह्यने, निवाणे, मोकभणगी, दरेभणगी , देसराणे, गणोरे, बेज आणि कळवण शहर या भागातील सामान्य रुग्णालय, राजवाडे येथील कृषी, वाणिज्य आणि घरगुती वर्गातील ग्राहकांना कमी दाबाच्या विजेची समस्या निर्माण होत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे काम पूर्ण होईपर्यंत सदर समस्या कायम राहू शके ल. त्यामुळे ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.