News Flash

पावसाचे पाणी अडविण्यासाठी महाश्रमदान

जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जलसंवर्धनासाठी गाव एकत्रित येणे ही विकासाची सुरुवात असल्याकडे लक्ष वेधले

सिन्नरच्या पाटपिंपरी येथे श्रमदानात सहभागी झालेले नागरिक.

किरण रावसह दोन हजार जणांचा सहभाग

नाशिक : महाराष्ट्र दिनानिमित्त सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी येथे पाणी अडविण्यासाठी महाश्रमदान करण्यात आले. या उपक्रमात लहानग्यापासून ते ज्येष्ठांपर्यंत, शासकीय अधिकाऱ्यापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत, इतकेच नव्हे तर अभिनेता आमीर खानची पत्नी किरण राव यांच्यापासून ते स्थानिक कलावंतांपर्यंत, शहरी अन् ग्रामीण भागातील तब्बल दोन हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

महाराष्ट्र दिनानिमित्त मंगळवारी शहरात विविध कार्यक्रम होत असताना ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या पाश्र्वभूमीवर अशा प्रकारे महाश्रमदानाचा अनोखा कार्यक्रम पार पडला. गावातील समस्या दूर करण्यासाठी श्रमप्रतिष्ठा पुनस्र्थापित करण्याची गरज आहे. श्रमदानाच्या माध्यमातून शहर आणि गावाचा समन्वय झाला असून श्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक ऋण फेडण्यासाठी आणि पाणी संवर्धनासाठी नागरिकांनी अशा उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी यावेळी केले. पुढील पिढीला पाणीदार गाव पाहायला मिळावे यासाठी ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने श्रमदानात सहभागी होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जलसंवर्धनासाठी गाव एकत्रित येणे ही विकासाची सुरुवात असल्याकडे लक्ष वेधले. गावाने चांगले काम केल्यास प्रशासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांनी पाण्यासाठी एकजूट दाखवावी आणि वॉटर कप स्पर्धेत गावाला यश मिळवून द्यावे, असे आवाहन केले.

जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक रविवारी श्रमदानात सहभागी होतील, असेही ते म्हणाले. पाणी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ आणि राव यांनीदेखील विचार मांडले. बीजेएसचे नंदकिशोर साखला यांनी आवश्यकता भासल्यास अधिक जेसीबी यंत्र उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली.

श्रमदान असे झाले

श्रमदानासाठी पाणी फाऊंडेशनतर्फे ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. दहा मीटरची जागा १३ ठिकाणी दीड फूट खोल आणि दोन मीटर रुंद खोदण्यात आली. प्रत्येकी आठ व्यक्तींच्या गटाला एक जागा श्रमदानासाठी देण्यात आली. त्यातील माती बाजूला टाकत ०.८५ मीटर उंचीचा बांध तयार करण्यात आला. टिकाव, फावडे आणि तगाऱ्याचे ३५० संच श्रमदानासाठी उपलब्ध करून देण्यात आले. श्रमदानाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. नागरिकांचा उत्साह वाढविण्यासाठी गावातील भजनी मंडळाने पारंपरिक रचना सादर केल्या. श्रमदानात उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आदींनी सहभाग घेतला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 3:02 am

Web Title: kiran rao and two thousand people participated in work to block rain water
Next Stories
1 प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियम भांडय़ांचा आरोग्यमय पर्यावरणपूरक वापर शक्य
2 टोल वाचवण्यासाठी बदलला मार्ग; बस दरीत कोसळून ३ ठार, २२ जखमी
3 करवाढ स्थगिती; भाजपची माघार
Just Now!
X