उच्च न्यायालयाने त्र्यंबकेश्वर येथील तिसरे शाहीस्नान तसेच सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत कोणत्याही सोहळ्यासाठी धरण वा तलावातून पाणी सोडू नये, अशी सूचना केली असली तरी जिल्हा प्रशासन अद्याप आपला मूळ मुद्दा सोडण्यास तयार नाही. या पाश्र्वभूमीवर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने त्र्यंबकेश्वर येथे स्नानासाठी उभारलेल्या ‘तुषार’ अर्थात ‘शॉवर’चा वापर होईल की नाही, याबद्दल साशंकता आहे. पर्वणीनंतर त्याचा वापर करावा की नाही याबाबत फेरविचार होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. म्हणजे, त्र्यंबकच्या अखेरच्या पर्वणीत ‘तुषार स्नान’चा वापर झाला तर पाण्याचा अपव्यय आणि वापर केला नाही तर खर्च पाण्यात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी अतिशय कमी जागा उपलब्ध असते. यामुळे गर्दीच्या वेळी सर्वाना स्नानाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रशासनाने खास ‘तुषार स्नान’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कुशावर्त तीर्थालगत तीन लाख रुपये खर्च करत ही व्यवस्था निर्माण केली. जेणेकरून स्नानासाठी होणारी गर्दी नियंत्रणात राहील तसेच पाण्याचा अपव्यय टळेल असे त्यामागचे प्रयोजन सांगितले गेले. तसेही कुशावर्तात नैसर्गिक पध्दतीने गंगासागर तलावातून पाणी येते. त्यामुळे जादा पाणी सोडणे किंवा पाण्याचे आरक्षण हा मुद्दाच नव्हता. पहिल्या पर्वणीच्या दिवशी अतिरेकी बंदोबस्तामुळे भाविक कुशावर्तापर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्याने गर्दी पुढे जाण्यासाठी तुषारस्नान सुरू करण्यात आले. मात्र ही गर्दी तिथेच रेंगाळल्याने ते लगेच बंद केले गेले. दुसऱ्या शाहीस्नावेळी अवघ्या काही मिनिटांसाठी या स्नानाचा आनंद काही भाविकांना घेता आला.
पर्वणीच्या दुसऱ्या दिवशी दोन-तीन वेळा तुषार स्नान सुरू करण्यात आले. मात्र लागलीच बंदही करण्यात आले. तिसऱ्या पर्वणीसाठी भाविकांची गर्दी वाढली आणि पोलिसांनी सूचना केल्यास त्याचा वापर होईल अन्यथा नाही असे नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एम. नागरे यांनी सांगितले.
कुशावर्त तीर्थ सोडून इतरत्र स्नान करण्याची भाविकांची तयारी नाही. तुषार स्नानामुळे पाण्याचा अपव्यय टळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार त्याचा वापर झाला. मात्र भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या नाराजीमुळे ही व्यवस्था बंद राहिल्याचे प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी या व्यवस्थेचा पर्वणीनंतर फेरविचार होईल असे सांगितले.
न्यायालयाने सिंहस्थात पाण्याचा अव्ययय करण्यावर आक्षेप घेतला आहे.

फेरविचार होईल..
शाही स्नानासाठी पाण्याच्या वापराबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या खुलाशाबाबत न्यायालय समाधानी असून पाणी वापराबाबत त्यांनी संमती दिली आहे. दुसरीकडे, तुषार स्नान व्यवस्थेचा वापर करायचा की नाही, याचा विचार पर्वणीनंतर होईल.
दीपेंद्रसिंह कुशवाह (जिल्हाधिकारी)