एकाच दिवशी सहा वेगवेगळ्या ठिकाणी चोरी

सिंहस्थातील कडेकोट बंदोबस्त सैल झाल्यानंतर चोरटय़ांनी पुन्हा डोके वर काढले असून शहरात जबरी चोऱ्या आणि घरफोडय़ांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कुंभमेळ्यात स्नानासाठी आलेल्या भाविकांना लुबाडणाऱ्या चोरटय़ांनी ही गर्दी ओसरल्यावर आता बंद घरे व लुटमारीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. एकाच दिवसात वेगवेगळ्या सहा घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज व रोकड चोरटय़ांनी लंपास केली.
सीबीएसकडे येणाऱ्या रिक्षात बसवून चोरटय़ांनी दोघांना धमकावत त्यांच्याकडील एटीएममधून काढलेली ३५ हजाराची रोकड घेऊन पोबारा केला. दोन मित्र रिक्षात बसल्यानंतर संशयित त्यांना रामवाडीमार्गे मधुबन कॉलनीत घेऊन गेले. आधी बँकेतुन काढलेले १५ हजार आणि नंतर धमकावत संबंधितांना बँकेच्या एटीएममधून २० हजार रुपये काढायला लावले. असे एकूण ३५ हजार रुपये घेऊन चोरटय़ांनी पलायन केल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. बंद घरांवरही चोरटय़ांची नजर आहे. गंगावाडी येथील गणाधिश अपार्टमेंट येथे बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १५० ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के असा ६६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. रामकुंड परिसरात अद्याप चोरटय़ांची पर्वणी सुरू आहे.
रामकुंडावर शाही स्नानासाठी आलेल्या भाविकाची १५ तोळ्याची सोन्याची चेन, घडय़ाळ, भ्रमणध्वनी व रोकड असा ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरातून चोरटय़ांनी ५० हजार रुपये किंमतीचे रोकड व सोन्याच्या चार बांगडय़ा चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोडवरील लक्ष्मीनारायण सोसासटीत तसाच प्रकार घडला. बंद घरातून चोरटय़ांनी ५८ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरातून चोरटय़ांनी ३१ हजाराचे दागिने गायब केले.
कुंभमेळ्यातील शाही स्नानापासून चाललेल्या या घडामोडी पाहिल्यास शहरात पोलीस यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडू शकतो. शाही स्नानाच्या दिवशी चोरटय़ांनी असाच धुमाकूळ घालून भाविकांची लाखो रुपयांची लुटमार केली होती.
सिंहस्थाची गर्दी काहिशी ओसरत असताना चोरटय़ांनी पुन्हा बंद घरांकडे लक्ष केंद्रीत केल्याचे दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून लक्षात येते.