23 September 2020

News Flash

मखमलाबाद शिवारात बिबटय़ाची दहशत

शहरातील मखमलाबाद आणि त्यालगतच्या चांदशी शिवारात अधिक्याने शेती आहे.

युवकावरील हल्ल्यानंतर पिंजरा लावला

नाशिक : पंचवटीतील मखमलाबाद शिवारात बिबटय़ाच्या हल्ल्यात बुधवारी युवक जखमी झाल्यानंतर वन विभागाने तातडीने पिंगळे मळा परिसरात पिंजरा लावला. काही महिन्यांपूर्वी मखमलाबाद परिसरात बिबटय़ाचा मुक्त संचार समोर आला होता. आता बिबटय़ाने थेट हल्ला चढविल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील मखमलाबाद आणि त्यालगतच्या चांदशी शिवारात अधिक्याने शेती आहे. मळे परिसरात बिबटय़ाचे दर्शन घडत असताना बुधवारी सकाळी मखमलाबाद शिवारातील कालवा भागात बिबटय़ाने पवन रमेश तांदळे या युवकावर हल्ला केला. या हल्ल्यात पवन जखमी झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने धाव घेतली. पिंगळे मळा परिसरात बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा उभारण्यात आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

याआधी मखमलाबादसह शहरातील काही भागांत बिबटय़ाने शिरकाव केल्याची उदाहरणे आहेत. बिबटय़ाच्या मुक्त संचारामुळे अनेकदा गोंधळ उडाला आहे. स्थानिकांना दहशतीत वावरावे लागले. बिबटय़ाला जेरबंद करताना वन विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. मखमलाबाद आणि लगतच्या चांदशी शिवारात बहुतांश भागात शेती असल्याने तिथे बिबटय़ाला लपण्यासाठी जागा मिळते. लहान मुले बाहेर खेळत असतात, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना मळे परिसरातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. बिबटय़ाच्या हल्ल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून पुन्हा हल्ल्यासारखे प्रकार घडू नये म्हणून वन विभाग दक्षता घेत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 3:41 am

Web Title: leopard terror in makhmalabad shivar
Next Stories
1 पिंपळनारे गावाची घनकचरा मुक्तीकडे वाटचाल
2 महापौर फिरकेनात!
3 औद्योगिक सुरक्षा दलातील जवानांच्या वाहनांची जाळपोळ
Just Now!
X