नाशिक, दिंडोरी मतदारसंघात अनेक केंद्रांवर रांगा

नाशिक : लोकसभा निवडणुकीचे मतदान आणि त्याच सुमारास आलेली उष्णतेची लाट, याचा मतदानावर परिणाम होण्याची साशंकता सोमवारी मतदानासाठी उत्साहात घराबाहेर पडलेल्या मतदारांनी खोटी ठरवली. सकाळी सातपासून अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. दुपारी काहीसा शुकशुकाट जाणवला, पण सायंकाळी ही कसर पुन्हा भरून निघाली. विशेष म्हणजे, सळसळता उत्साह नवमतदारांपासून मध्यमवयीन, अगदी ज्येष्ठांपर्यंत होता. सकाळी पहिल्या दोन तासांत नाशिक लोकसभा मतदारसंघात ६.९९ वर असणारी टक्केवारी सायंकाळी पाचपर्यंत ५३.०९ पर्यंत, तर दिंडोरीत ७.२८ वरून ५८.२० टक्क्यांवर पोहोचली. मतदारांच्या प्रतिसादामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी सात वाजता कडेकोट बंदोबस्तात चार हजार ७२० केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. आदल्या दिवशी म्हणजे रविवारी नाशिकमध्ये हंगामातील सर्वाधिक ४२.८ अंशाची नोंद झाली होती. थंड हवेसाठी प्रसिध्द असणाऱ्या नाशिकचा पारा काही वर्षांत प्रथमच इतक्या उच्च पातळीवर पोहोचला. रणरणत्या उन्हामुळे राजकीय पक्षांना मतदानात घट होण्याची धास्ती वाटू लागली होती. तथापि, तसे काही घडले नाही. उलट मतदार स्वत:हून घराबाहेर पडले. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणारे आपले कर्तव्य बजावण्यासाठी पूर्वसंध्येला शहरात दाखल झाले. उष्णतेला तोंड द्यावे लागू नये म्हणून सकाळपासून मतदारांची पावले केंद्राकडे पडू लागली होती. कॉलेज रोडवरील बीवायके महाविद्यालय, गंगापूर रस्त्यावरील वाघ गुरुजी शाळा, रचना विद्यालय, नाशिकरोड परिसर, सिडकोतील अनेक केंद्रांवर मतदानासाठी अर्धा ते पाऊण तास रांगेत प्रतीक्षा करणे भाग पडले. या केंद्रातील काही बूथसमोर लांबच लांब रांग, तर काही बूथमध्ये फारशी वर्दळ नसल्याचे पाहावयास मिळाले. प्रत्येक केंद्रात १४०० मतदार असे नियोजन केले गेले होते, परंतु त्या केंद्रातील एखाद्या खोलीत ४०० ते ५०० मतदार, तर दुसऱ्या खोलीत १२०० ते १४०० मतदार अशी विभागणी झाल्यामुळे त्या त्या ठिकाणी रांगा लागल्याचे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

रांगा असणाऱ्या अनेक केंद्रांवर ज्येष्ठांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत अनेक केंद्रात मतदारांची गर्दी होती. मनमाड शहरासह ग्रामीण भागातही लोकशाहीच्या महाउत्सवात मतदार उत्साहात सहभागी झाले. उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील केंद्रांवर आरोग्य पथक तैनात केले होते. त्याचाही मतदारांना आधार मिळाला. सकाळपासून दिसणारे हे चित्र दुपारी दोन वाजेपर्यंत कायम होते. उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारनंतर गर्दी ओसरली. काही केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. परंतु दुपारी चारनंतर पुन्हा मतदारांची रीघ लागली.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाआघाडीचे समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार, अपक्ष माणिक कोकाटे यांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार, महाआघाडीचे धनराज महाले, माकपचे जिवा पांडू गावित यांनी आपल्या हक्काचे मतदान होईल, यावर लक्ष केंद्रित केले होते. मतदारांनी मतदान करावे, याकरिता वेगवेगळ्या आस्थापना, विश्वास बँक, हॉटेल्स आदींनी नागरिकांसाठी सवलती वा बक्षिसाच्या योजना सादर केल्या होत्या. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने विशेष उपक्रम राबविले. या सर्वाची परिणती मतदानाची टक्केवारी उंचावण्यात झाली. जिल्ह्य़ात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दोन्ही मतदारसंघातील

६० संवेदनशील मतदार केंद्रांवर जादा बंदोबस्त तैनात करत तेथील घडामोडींचे वेब कास्टिंग करण्यात आले. निवडणूक कामासाठी वापरलेल्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असल्याने सर्व घडामोडींवर प्रशासनाची नजर होती.

कर्मचाऱ्यांना पाच कोटींचा भत्ता

मतदान प्रक्रिया शांततेत, सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या कामात तब्बल ३२ हजार मतदान अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्यात सुमारे पाच हजार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. उर्वरित २७ हजार कर्मचारी हे मतदान केंद्रावरील आहेत. या सर्वाना मतदानाच्या दिवसाचा भत्ता म्हणून पाच कोटींहून अधिकचा भत्ता दिला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

‘वोट कर नाशिककर’ला प्रतिसाद

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अधिकाधिक मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘वोट कर नाशिककर’ या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला. त्या अंतर्गत मतदानाचा संकल्प करून जास्तीत जास्त मतदान व्हावे, याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. मतदाराला ज्या बोटाला शाई लावली आहे, तो हात पुढे करून छायाचित्र ‘वोट कर नाशिककर’ फेसबुक पानावर समाविष्ट करता आले. या उपक्रमात शासकीय अधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांच्यासह अनेकांनी मतदान करत इतरांना प्रोत्साहन दिले. मतदारांसाठी प्रशासनाने १९५० मदतवाहिनी क्रमांक ठेवला होता. या क्रमांकावर ५०० हून अधिक दूरध्वनी आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या भ्रमणध्वनीवर ३०० दूरध्वनी तर शेकडो लघुसंदेश आले. या सर्वाला प्रतिसाद दिला गेला. या सर्वामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यात यश आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले आहे.