तीन संशयितांना अटक

शहरातील गुन्हेगारी आणि किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हत्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाशिकरोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुलाखाली वाहन लावण्याच्या वादातून रविवारी रात्री उशिरा भाजीपाला विक्रेत्याची त्याच्या घरासमोरच हत्या करण्यात आली. या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकरोड भागात काही जणांकडून थेट पोलिसांनाच मारहाण करीत आव्हान देण्यात आले होते. सातत्याने घडणाऱ्या दहशतीच्या घटनांमुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अरिंगळेमळा येथील श्रीकृष्णनगरात राहणारे नरसिंग शिंदे (४२) हे नाशिकरोड येथील वीर सावरकर पुलाखाली कुटुंबासह भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. रविवारी रात्री पावणेनऊ वाजता शिंदे यांचा मुलगा मारुती हा वडिलांना उसळ देण्यासाठी वाहन घेऊन गेला. दुकानाच्या बाजूला दीपक पाडळेने आपली दुचाकी उभी केली होती. आपली गाडी त्या ठिकाणी उभी करण्यासाठी मारुती गेला असता दीपक आणि त्याची आजी मीराबाई यांनी त्याला शिवीगाळ केली. हा वाद सोडविण्यासाठी नरसिंग शिंदे गेले असता त्यांनाही दोघांनी शिवीगाळ केली. वाद वाढल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तसेच अन्य भाजी विक्रेत्यांनी वाद सोडविला. या वादाची माहिती शिंदे यांनी कुटुंबातील अन्य सदस्यांना दिल्यानंतर त्यांना थेट घरी निघून या, असे सांगण्यात आले.

रविवारी रात्री शिंदे घरी परतले. त्यावेळी मोठा मुलगा संदीप अजून का आला नाही हे पाहण्यासाठी नरसिंग शिंदे हे घराबाहेर पडले. रात्री सव्वा दहा वाजता शिंदे यांच्या घराबाहेरच आरडाओरड ऐकू येताच कुटुंबातील अन्य सदस्य बाहेर पडले. त्यावेळी संशयित दीपक पाडळे, सुरेश ऊर्फ पिंटय़ा सोनवणे, आकाश पाडळे, अमोल पाडळे, अल्पवयीन मुलगा हे नरसिंग आणि संदीप यांना लाकडी दंडुक्याने मारहाण करताना त्यांना दिसले. एकाने नरसिंग यांना पकडून ठेवत दुसऱ्याने त्यांच्यावर वार केले. अन्य काही जण संदीपला मारहाण करत होते. उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी शिंदे यांना मृत घोषित केले. संदीपसह एकावर उपचार सुरू आहेत.  नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत  दीपक पाडळे (२६), आकाश पाडळे (२३), पवन नाईक (३०) यांना ताब्यात घेतले आहे.

सर्वत्र असे प्रकार घडतात

वाहन लावण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद शमला होता. याबाबत परस्पर सामंजस्याने चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होता, परंतु वादातून वाद वाढत गेला. त्यातून एकाने शस्त्राने हल्ला केला. यात शिंदे यांना रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांचा मृत्यू झाला. सर्वत्र असे काही प्रकार घडत असतात. आपण प्रत्येक गोष्ट दुसऱ्या एखाद्या प्रकरणासोबत जोडू शकत नाही.   – शांताराम ढोकणे वरिष्ठ निरीक्षक, नाशिकरोड पोलीस ठाणे</strong>

नाशिकरोड-उपनगर परिसरात गुन्ह्य़ांच्या प्रमाणात वाढ

काही दिवसात खून, खुनाचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ला, एटीएममधून पैसे चोरी, वाहतूक पोलिसांशी अरेरावी यासह अन्य गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकरोड, उपनगर परिसर अस्वस्थ आहे. गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस घडत असताना विशेष म्हणजे पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली असतांनाही पोलीस आक्रमक भूमिका घेत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.