‘कुसुमाग्रज स्मरण यात्रे’त गिरीश कुबेर यांचे मत

लोकशाहीत समानता, विचारस्वातंत्र्य महत्त्वाचे असते. अमेरिका, तसेच युरोपीय देशांप्रमाणे भारतात लोकशाहीची मूल्ये अद्याप रुजलेली नाहीत. सरंजामशाही प्रवृत्ती आजही कायम आहे. देशात लोकशाहीची मूल्ये रुजविण्यासाठी मनाची मशागत व्हायला हवी, असे सांगतानाच कोणत्याही घटनेवर व्यक्त न होता काठाकाठाने मत मांडणे हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य असू शकत नाही. ते स्वातंत्र्य करकरीतच असायला हवे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडले. येथील कुसुमाग्रज स्मारकात ‘कुसुमाग्रज स्मरण यात्रा’ उपक्रमांतर्गत ‘साहित्य, कला, संस्कृती आणि लोकशाही’ या विषयावर कुबेर यांची मुलाखत प्रतिष्ठानचे सल्लागार लोकेश शेवडे यांनी गुरुवारी घेतली, त्या वेळी ते बोलत होते.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Brazil Supreme Court judge wants to investigate Elon Musk and X
एलॉन मस्क यांची ‘या’ देशात होणार चौकशी? काय आहे प्रकरण?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

पुस्तकांवरील बंदी, सहिष्णुता-असहिष्णुता, समाजमाध्यमांमुळे कोणत्याही घटनेला प्राप्त होणारे झुंडशाहीचे स्वरूप या संदर्भात उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना कुबेर यांनी या वेळी पत्रकारिता आणि साहित्य यांचा संबंध उलगडून दाखविला. साहित्य, कला, संस्कृती, लोकशाही एकमेकांवर परिणाम करतात. सध्या जागतिक पातळीवर भ्रम निर्माण करणारे वातावरण आहे. या परिस्थितीत लेखन आणि वाचन पातळीवर नागरिकांनी सुजाण होण्याची आवश्यकता व्यक्त करून ते म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत विचारांची लढाई विचारांनी लढायला हवी. लोकशाहीत व्यक्त होणे, प्रश्न विचारणे, प्रत्येकाच्या मताचा आदर करीत खंडन-मंडन अभिप्रेत आहे. पंडित नेहरू, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या मंडळींनी मतभिन्नता म्हणजे शत्रुत्व असे मानले नाही, असा दाखला देत कुबेर यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे नेमके अवकाश उलगडून दाखविले. ते म्हणाले, आपल्या देशात एकूणच एकमेकांना सांभाळून घेण्याची मानसिकता जोपासली गेली आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची भारतीयांची कल्पनादेखील कोणाबद्दल वाईट बोलू नका किंवा लिहू नका, अशी असून तिचा उपयोग आजवर सहिष्णुता सांभाळण्यातच झाला. येथे सरकार कोणाचे हा मुद्दा गौण असून ही परंपरा पूर्वापार आहे. मुळात सहिष्णुता-असहिष्णुता ही संकल्पना अज्ञानातून आली असून, ती ज्ञानातून येणे गरजेचे आहे.

‘बंदी-प्रवृत्ती’वरही त्यांनी या वेळी प्रहार केले. ते म्हणाले, जगाच्या इतिहासात डोकावले तर बंदीने काहीच साध्य होत नाही हेच दिसते. बंदीची मागणी करणे हे समाजाच्या संकुचित विचारसरणीचे लक्षण आहे. कोणत्याही गोष्टीवर बंदी घालणे म्हणजे वास्तवाला सामोरे जाणे टाळणे. बंदीतून मार्ग काढण्याचे अनेक पर्याय शोधले जातात. एखाद्या पुस्तकावर बंदी घातली गेली तरी ते लोकांकडून अन्य मार्गाने वाचले जाणार हे निश्चित असते. यामुळे विचारांवर बंदी असू नये. आजवर भारत-चीन युद्धाशी संबंधित कागदपत्रे खुली करण्याची मागणी करणारे, सत्ताधारी झाल्यावर मात्र ही कागदपत्रे खुली करणे टाळतात, याचा दाखला याच प्रतिपादनाच्या ओघात कुबेर यांनी दिला. कला संस्कृती व्यवस्थेला आव्हान दिल्याशिवाय पुढे जात नाही. समाजमाध्यमांमुळे माणसे झुंडशाहीकडे वळत असून हे धोकादायक आहे. यामुळे बहुसंख्याकवादाचा मुद्दा चर्चेत आला असून तार्किकदृष्टय़ा सुसंगत वाद होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

पत्रकारिता आणि साहित्य यांचा निकटचा संबंध आहे. जगाचा उत्तम इतिहास पत्रकारिता क्षेत्रातील मंडळींनी लिहिलेला आहे. परंतु सध्याची पत्रकारिता केवळ बातमीच्या चौकटीतच अडकून पडली आहे. बातमी पलीकडे चौकसपणे पाहण्याची सवय लागली की, साहित्याची रुजवात होते. बातमीच्या पलीकडे जाऊन संवेदनशील पद्धतीने लिखाण केल्यास चांगले दस्तऐवजीकरण आणि उत्तम साहित्यनिर्मिती होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाआधी स्थानिक कलावंतांच्या कलाकृतींचा अंतर्भाव असणाऱ्या ‘छंदोमयी’ प्रदर्शनाचे उद्घाटन कुबेर यांच्या हस्ते झाले.