News Flash

‘लोकांकिका’ मुंबई-पुण्याशी स्पर्धा करण्याचे थेट व्यासपीठ!

सांघिक स्पर्धेत संघाचे टय़ुनिंग जुळले की योग्य कलाकृती साकारली जाते.

 

मुंबई-पुण्याशी स्पर्धा करण्याचे थेट व्यासपीठ लोकसत्ताने लोकांकिकेमार्फत उपलब्ध करून दिले. त्यातून वैदर्भीय कलागुण मोठय़ा व्यासपीठांवर सादर करण्याची संधी मिळणार आहे, शिवाय इकडच्या लोकांच्याबाबतीत समज, गैरसमजही खोडून काढण्याची संधी असल्याने महाअंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी विभागीय फेरीतही उत्तम सादरीकरणाचा प्रयत्न राहील, असे ‘उपोषण’कर्ते मिथून हटवार आणि रोहित घांगरेकर यांनी सांगितले.

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक हरिशंकर परसाई यांच्या कथेचे सार उचलून तिच्यात नावीन्य आणून व्यवस्थित आणि नेटक्या सादरीकरणाने पहिल्या पाचात ‘उपोषण’ने स्थान पटकावले. एका माणसाला प्रेम तिच्यापर्यंत पोहोचवायचे असते आणि त्यासाठी ‘उपोषण’ हे माध्यम तो निवडतो. मात्र त्यात बाकी अनावश्यक घटकांचा समावेश होऊन प्रेम बाजूला राहते आणि इतर विषयच डोके वर काढतात, अगदी अमिरखानचं ‘पिपली लाईव्ह’ सारखच म्हणता येईल. कुशल चिटणीस लिखित आणि मिथुन हटवार दिग्दर्शित एकांकिकेला प्राथमिक फेरीत प्रेक्षकांकडूनही चांगली दाद मिळाली.

सांघिक स्पर्धेत संघाचे टय़ुनिंग जुळले की योग्य कलाकृती साकारली जाते. त्यामुळे स्पर्धा इतर एकांकिकांपेक्षा स्वत:च्याच एकांकिकेशी असते, हे उघडच. ‘उपोषण’कर्त्यांना परीक्षकांनी सुचवलेल्या आणि पुन्हा मुलांनाही स्वत: होऊन कराव्याशा वाटणाऱ्या सुधारणा घेऊन विभागीय अंतिम फेरीत ते सादर करणार आहेत. तिकडच्या स्पर्धाची पातळीच वेगळी. पण नागपूरला ‘अंडर एस्टिमेट’ केले जाते, ही भावना अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे.

लोकांकिका आमच्यासाठी मोठे व्यासपीठ

विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम करंडकपासून सुरुवात केली. ज्या क्षेत्रात केवळ पुण्या-मुंबईचेच वर्चस्व होते. त्या स्पर्धात आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादित केले. सांस्कृतिक क्षेत्रातील स्पर्धामध्ये निवडक मुलेच सहभाग घेतात. अभ्यास सांभाळून करा, असे त्यांना सांगणे असतेच. पण कलेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडीशी सूट द्यावीच लागते. आम्ही ती देतो. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याने स्पर्धामध्येही त्याचे प्रतिबिंब उमटते. म्हणूनच पुरुषोत्तम करंडकमध्येही मुलांनी चांगले यश संपादित केले. लोकांकिके मुळे मोठे व्यासपीठ त्यांना उपलब्ध होण्यास मदत होईल.

विठ्ठलराव खोबरागडे प्राचार्य, विठ्ठलराव खोबरागडे कॉलेज, चांपा.

 

तोगैरसमज खोडून काढू

तांत्रिक गोष्टींकडे लक्ष देणार. प्रत्येक एकांकिकेला ६० मिनिटांचा वेळ आहे. सेट आणि लाईट लावून सादरीकरण करायचे आहे. विभागीय अंतिम फेरीतील सर्व नियम प्रत्येक एकांकिका कर्त्यांनी पाळावेत अशी अपेक्षा. केवळ तांत्रिक गोष्टींमुळे हातचे यश जायला नको, असेही प्रत्येक टीमला वाटत असते, तेच आम्हालाही. वैदर्भीय टिपिकल एकंकिका करतात, असाही एक गैरसमज आहे. तो खोडून काढण्याची संधी लोकांकिकेतून शक्य होणार आहे.

रोहित घांगरेकर

 

आम्ही सक्षम आहोत

आम्ही आमच्या पद्धतीने सक्षम आहोत. प्राथमिक फेरीत तांत्रिक बाबीत थोडीशी उणीव राहिली असावी. ती परीक्षकांनी समजावून सांगितली. सुधारित एकांकिका घेऊन अंतिम फेरीला सामोरे जातोय. त्यातील चांगले-वाईट प्रेक्षकांकडून कळेलच. प्राथमिक फेरीत परीक्षक उत्तम होते. ते नागपूर बाहेरचे असल्याने स्थानिक संस्थांचे लागेबांधे असण्याचे कारण नाही. त्यामुळे पूर्ण फोकस प्रॉडक्शनवर होता. हिंदीचा प्रभाव आणि पुण्या-मुंबईच्या तुलनेत तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव यामुळेही फरक पडतो. भाषेच्या पातळीवर बरच अडतं पण, त्यावर आम्ही मात करू.

मिथुन हटवार

 

आत्मविश्वासात भर घातली!

नाटकाला रसिकांचाही आश्रय असायला हवा. पण पुण्या-मुंबईच्या नाटकांचे कौतुक करणारे प्रेक्षक वैदर्भीय कलावंतांना प्रोत्साहन देत नाहीत. लोकांकिकेत पारदर्शी सादरीकरण, कलावंतांची जय्यत तयारीने आमचाही आत्मविश्वास दुणावल्याचे मत ‘मलबा’कारांनी प्राथमिक फेरीच्यावेळी स्पष्ट केले.

फारसे प्रसिद्धीस नसलेल्या रेनायन्स महाविद्यालयाची चर्चा झाली ती ‘लोकांकिके’तील त्यांच्या ‘मलबा’ एकांकिकेमुळे. मलबा एकांकिका ही इतर प्रतिस्पर्धकांच्याही चर्चेचा विषय होता. वैदर्भीय कलावंतांना वेगवेगळ्या पातळ्यांवर येणाऱ्या अडचणी, प्रेक्षकांचा नाटय़कलावंतांना नेहमीच नकार, महाविद्यालयांमध्येही नाटकाला शेवटचे प्राधान्य असे विविध विषय यानिमित्त मलबाच्या टीमने व्यक्त करून नाटय़कलावंतांना विपरित परिस्थितीतून कसे जावे लागते आणि तरीही ‘लोकांकिके’साठी केलेल्या तयारीची चर्चा त्यांनी केली.

अगदी राज्यनाटय़ स्पर्धा, पुरुषोत्तम करंडकमध्येही प्रेक्षक स्वत: होऊन येत नाहीत. वैदर्भीय कलावंतांशी येथील प्रेक्षकांचाच दुहेरी व्यवहार असतो. ३०० रुपयांचे तिकीट काढून सिनेमा, नाटकाला जातील पण, विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धाकडे पाठ फिरवतील. त्यामुळे रसिकांची खरी दाद मिळावी किंवा आमच्या नाटकातील चांगल्या-वाईट बाजूंना कळाव्यात यासाठी परीक्षकाच्या भूमिकेत असलेले रसिक मिळावेत, अशी अपेक्षा नाटकाचे लेखक अश्लेष जामरे यांनी व्यक्त केली. यासर्व चांगल्यावाईट परिस्थितीत ‘लोकांकिका’चे व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्याचा कॉलेज युवांना नक्कीच लाभ होईल, असे मलबाच्या टीमने सांगितले.

‘मलबा’चा विषय अगदीच वेगळा आणि हृदयस्पर्शी होता. प्राथमिक फेरीत दुसऱ्या क्रमांकावर ही एकांकिका झाली. परीक्षकांनी फार मोलाच्या सूचना पूर्ण स्टेजवरील आणि स्टेजच्या मागील कलावंतांना केल्या होत्या. त्यात मुख्य भूमिकेत पुष्पक भट, शिवानी सिंग, सचिन बुरे, सुरज युळणे, शिवम द्विवेदी आणि रौनक खंबळकर हे कलावंत होते.

लोकांकिकेमुळे मुलांचे सुप्त गुण कळले

महाविद्यालयीन मुलांचे वेगळे इंटरेस्ट असतात. ते जपावे लागतात. वाव दिल्याने त्यांच्यातील सुप्त गुण कळतात. लोकांकिमुळे मुलांचे सुप्त गुण कळले. यापूर्वी महाविद्यालय खरोखरच फारसे चर्चेत नव्हते पण, आमच्या येथील बीबीए अभ्यासक्रमाचे प्रा. बोरकर यांच्या प्रोत्साहनामुळे ते वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊ लागले आहेत. परीक्षाही महाविद्यालयात सुरू आहेत. मात्र, आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी नक्कीच विभागीय अंतिम फेरी पाहायला येतील.

प्रशांत जांभुळकर, शैक्षणिक व्यवस्थापक, रेनायन्स महाविद्यालय

 

चांगली संधी

लोकांकिका छान वाटली. चांगली संधी लोकसत्ताने उपलब्ध करून दिली. त्यामुळे आमच्यासारख्या मुलांचे स्टेज डेअरिंगबरोबरच, आत्मविश्वासही वाढला. परीक्षकांनी खूपच चांगल्या सूचना केल्या. शिवाय अ‍ॅप्रेसिएटही केले. इतर स्पर्धामध्ये स्थानिक परीक्षक असतात मात्र, येथे बाहेरचे परीक्षक असल्याने फारच छान वाटले.

स्नेहा खंडारे

 

नाटय़ रसिकांचे प्रोत्साहन मिळावे

पुण्या-मुंबईच्याही लोकांना झाडीपट्टी रंगभूमीचे आकर्षण आहे. त्यासाठी ते येतातही. कॉलेजमध्ये सोशल गॅदरिंग होते. त्यात ‘स्किट’ नावाचा १५-२० मिनिटांचा प्रकार तेवढा नाटय़ रूपाने मांडता येतो. एकांकिका म्हणजे काय हे तर माहितीच नाही बऱ्याच लोकांना. त्यामुळे ती होण्याचा प्रश्नच नाही. बरेचदा लाईटस्, विंग्ज आणि इतर तांत्रिक ज्या नाटकांसाठी गरजा असतात त्या उपलब्ध होत नाहीत. नाटय़ रसिकांनी वैदर्भीय कलावंतांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

पुष्पक भट

राज्यस्तरीय दुसरी फेरी आणि विभागीय अंतिम फेरी

  • स्थळ: सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर, नागपूर
  • वेळ : सायं ५ वाजता.
  • प्रमुख पाहुणे : ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक डॉ. रंजन दारव्हेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:29 am

Web Title: loksatta ekankika nagpur
Next Stories
1 कचरा, पथदिवे, पाण्याची समस्या
2 रखडलेल्या बांधकामांचा मार्ग खुला
3 महिन्यानंतरही एटीएम बंदच
Just Now!
X