पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणेत काही भागांत पाणीटंचाई

शहरातील काही भागांत कमी दाबाने आणि एकच वेळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत असून धरणात मुबलक पाणी असताना ही स्थिती ओढवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. पंचवटीतील तारवालानगर व तलाठी कॉलनी परिसरात पाणीपुरवठा विभाग पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग करत आहे. त्यातून एक वेळ पाणीपुरवठा झाल्यामुळे स्थानिकांमध्ये संभ्रम झाल्याचे पालिकेने म्हटले आहे. शहरात सध्या दररोज ४१ कोटी लिटर पाणी पुरविले जात असून कुठेही तुटवडा नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पंचवटीतील तारवालानगर, तलाठी कॉलनी व शिवनगर भागात अकस्मात एकवेळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली. याबद्दल काही महिलांनी पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. या परिसरात शुद्धीकरण प्रकल्पाच्या जलकुंभातून पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यात या भागात टंचाई जाणवते. ही बाब लक्षात घेऊन या परिसरातील पाणीपुरवठा जवळच्या अन्य जलकुंभावर स्थलांतरित करण्यात आला. पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधार करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेल्या या प्रयोगाचीमाहिती नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याने या घडामोडी घडल्याचे सांगितले जाते. मध्यंतरी काही नगरसेवकांनी शहरात एकवेळ पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यातून हा प्रकार घडल्याची साशंकता काहींनी व्यक्त केली. मात्र, हा तसा प्रकार नसून उलट सुरळीत पाणी पुरवठय़ासाठी हा प्रयोग राबविला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख यू. बी. पवार यांनी दिली. एका विशिष्ट भागापुरताच हा प्रयोग मर्यादित आहे. त्याची माहिती काही नागरिकांपर्यंत पोहोचली नाही. संबंधित परिसराचा पाणीपुरवठा ज्या जलकुंभावर स्थलांतरित केला गेला, तेथून एक वेळ पाणीपुरवठा होतो. सिंहस्थातील जलवाहिनी व तत्सम सामग्री वापरून संबंधित भागाला पुरेसा व मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. आधी संबंधित भागाला दोन वेळा पाणीपुरवठा होत असे. मात्र तो पुरेसा नसल्याच्या तक्रारी व्हायच्या. नव्या प्रयोगाद्वारे मुबलक स्वरूपात पाणी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा पवार यांनी केला. सद्य:स्थितीत शहरात दररोज ४१० एमएलडी म्हणजे ४१ कोटी लिटर पाणीपुरवठा केला जातो. धरणात मुबलक जलसाठा असल्याने कोणत्याही भागात पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात बदल केला गेला नसल्याचे सांगण्यात आले.