साडेसात हजारहून अधिक नवीन पदे प्रस्तावित; नव्या आकृतिबंधाबाबत लवकरच निर्णय

महापालिकेच्या नव्या आकृतिबंधात साडेसात हजारहून अधिक नवीन पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यास शासनाने हिरवा कंदील दाखविल्यास महापालिकेत महानोकरभरतीचा मार्ग खुला होणार  आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने बैठकीचे आयोजन करून निर्णय घेतला जाणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. तोवर तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी भरती करण्याचे पाटील यांनी सूचित केले आहे.  त्यासंबंधीचे अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.  नवा आकृतीबंध आणि तात्पुरत्या स्वरूपात नोकरभरती असे दोन्ही विषय एकाचवेळी नगरविकास राज्यमंत्र्यांनी मांडल्याने प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.

गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर आलेले नगरविकास राज्यमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक झाली. मनुष्यबळाअभावी काम करणे जिकिरीचे ठरत असल्याचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. पालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नव्या आकृतीबंधाला मान्यता मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर लगोलग ही बैठक झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची आशा पल्लवित झाली. सद्यस्थितीत महापालिका आस्थापना परिशिष्ठावरील ७०९० मंजूर पदे आहेत.  काही वर्षांपासून महापालिका शासनाकडे वारंवार प्रस्ताव पाठवत आहे. प्रकल्प अधिकारी, साहाय्यक प्रकल्प अधिकारी, खत प्रकल्प केंद्र चालक, विशेष भूमि संपादन अधिकारी, अनधिकृत बांधकामे निर्मूलनासाठी पोलिसांची पदे, वाहतूक नियोजन कक्ष, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाहनचालक आदींना महापालिका सेवेत सामावून घेण्यासाठी ३५ पदे नव्याने निर्माण करण्याची मागणी शासनाकडे केली गेली होती. त्यास अद्याप मान्यता नाही.  नवीन पदांच्या निर्मितीसाठी आकृतिबंधात तरतूद करण्यात आली आहे. मनुष्यबळासह अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नव्या आकृतीबंधाबाबत लवकरच मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.  मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल. मनुष्यबळ कमतरतेमुळे पालिकेची कामे रखडत असल्यास तूर्तास तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येईल. त्यासंबंधीचे अधिकार पालिका आयुक्तांना असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

भाजपचे ताटकळणे, सेनेचा बहिष्कार

महापालिकेत साडेअकरा वाजता आढावा बैठक होणार होती. त्यानुसार महापौर, विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय गटनेते आयुक्त कार्यालयालगतच्या बैठक कक्षात दाखल झाले. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे नियोजित वेळेच्या अर्धा ते पाऊण तास विलंबाने दाखल झाले. पाच मिनिटात आयुक्तांची भेट घेऊन ते पाथर्डी फाटा येथे पोलीस वसाहत इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी निघून गेले.  पुन्हा येणार असल्याचा निरोप ठेवल्यामुळे सत्ताधारी मंडळींना प्रतिक्षा करणे भाग पडले. विरोधी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची मंडळी वैतागली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे यांच्यासह सेना व कॉंग्रेसची काँग्रेसची मंडळी बाहेर पडली. पाऊण तासानंतर डॉ. पाटील यांचे महापालिकेत पुन्हा आगमन झाले. तोवर भाजपची मंडळी आणि प्रशासकीय अधिकारी ताटकळत बसले होते.

पदांचा आकृतिबंध

महापालिकेने सेवा प्रवेश नियमांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्या अनुषंगाने शासनाने महापालिकेला नव्याने आकृतीबंध तयार करण्यास सांगितले होते. त्या आधारे आस्थापनेवरील गट ‘अ’ ते गट ‘ड’मधील मंजूर पदांचा आणि नव्याने आवश्यक पदांचा विचार करून नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आस्थापना परिशिष्टावरील एकूण पदसंख्या ७०९० वरून १४ हजार ७४६ होईल. त्यामध्ये ‘अ’ गटातील १३९, ब गटातील १०९, ‘क’ गटातील २४२७, ‘ड’ गटात ४८४५ नवीन पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. माध्यमिक शिक्षण विभागात सध्या १४८ पदे मंजूर आहेत. त्यात नव्याने ५० पदांची भर नव्या आकृतिबंधात पडेल.