19 September 2020

News Flash

‘मविप्र’ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था ही मविप्र संस्थेची ओळख.

उद्या मतदान; सोमवारी निकाल

विधानसभा निवडणुकीप्रमाणे रंग भरलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राने गाजलेल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनल आणि माजी खासदार प्रतापदादा सोनवणे व अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील समाज विकास पॅनल या पारंपरिक विरोधकांमध्ये ही लढत आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मराठा समाजातील मतदार कोणाची निवड करतात, याचा फैसला सोमवारी मतमोजणीतून होणार आहे.

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था ही मविप्र संस्थेची ओळख. विविध राजकीय पक्षांमधून राजकारणात प्राबल्य राखणाऱ्या मराठा समाजातील नेत्यांचा या संस्थेवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न असतो. यामुळे तिची निवडणूक चुरशीची ठरते. यंदाची निवडणूक त्यास अपवाद नसल्याचे दोन्ही पॅनलच्या प्रचार धडाक्यातून समोर आले. २१ जागांसाठी एकूण ५२ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान होणार आहे.

संस्थेचे आजीव १० हजार १४७ आणि सेवक ४६४ असे एकूण १० हजार ६११ सभासद मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी संस्थेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र अथवा निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र, पॅनकार्ड, पारपत्र, वाहन परवाना तत्सम सादर करावा लागेल. मतदाराची ओळख पटल्याशिवाय मतपत्रिका दिली जाणार नाही तसेच मतदानही करता येणार नसल्याचे निवडणूक मंडळाने स्पष्ट केले आहे. निवडणूक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आधीच सर्व केंद्रांची पाहणी केली. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे ८०० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर साधारणत २५० मतदाराला एक बूथ यानुसार नियोजन करण्यात आले.

संस्थेचे निफाड तालुक्यात सर्वाधिक तर इगतपुरी, येवला व नांदगाव येथे कमी सभासद आहेत. यामुळे निफाड तालुक्यातील केंद्रावर १२ बूथ तर येवला, इगतपुरी व नांदगावच्या मतदान केंद्रावर प्रत्येकी एकच बूथ राहणार असल्याची माहिती निवडणूक मंडळाचे सदस्य अ‍ॅड. बाकेराव बस्ते यांनी दिली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवारी शहरातील संस्थेच्या मुख्यालय परिसरातील जिमखान्यात मतमोजणी होणार आहे.

त्या दिवशी सायंकाळी सात वाजेपूर्वी सर्व जागांचे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. दरम्यान, या निवडणुकीला अन्य निवडणुकीप्रमाणे जाहीर प्रचार थांबविण्याची कोणतीही कालमर्यादा नसल्याने शनिवापर्यंत रणधुमाळी सुरू राहील असे चित्र आहे.

मतदान केंद्र

इगतपुरी तालुक्यासाठी कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालय, कळवण-सुरगाणा तालुक्यांसाठी मानूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदवड तालुका जिजाबाई गुंजाळ माध्यमिक विद्यालय, दिंडोरी व पेठ तालुका जनता इंग्लिश स्कूल (दिंडोरी), नाशिक महापालिका क्षेत्रासाठी गंगापूर रस्त्यावरील मराठा हायस्कूल, निफाड तालुका कर्म. गणपतदादा मोरे महाविद्यालय, नांदगाव तालुका – नांदगाव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सटाणा तालुक्यात कर्मवीर आबासाहेब सोनवणे तथा ना.म. सोनवणे महाविद्यालय, मालेगाव तालुक्यासाठी सोयगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालय, सिन्नर तालुक्यात जीएमडी कला बी. डब्लू. वाणिज्य महाविद्यालय, नाशिक तालुक्यातील गावे, महापालिका क्षेत्रातील २० गावे व त्र्यंबकेश्वर तालुका यांच्यासाठी गंगापूर रस्त्यावरील अभिनव बालविकास मंदिर, सेवक सभासद मतदारसंघासाठी शिवाजीनगर येथील केआरटी महाविद्यालय हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे.

चुरशीच्या लढती

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेत सरचिटणीसपद हे सर्वात प्रभावशाली पद आहे. संस्थेच्या कामकाजाचे बहुतांश अधिकार या एकाच पदाकडे आहेत. या पदासाठी विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार आणि अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्यात सरळ लढत होत आहे. अध्यक्षपदासाठी प्रताप सोनवणे, तुषार शेवाळे आणि भास्कर पवार हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. समाज विकास पॅनलचे सोनवणे व प्रगती पॅनलचे शेवाळे हे दोन्ही उमेदवार कसमादे पट्टय़ातील आहेत. यामुळे ही निवडणूक कधी नव्हे इतकी चुरशीची बनली आहे. सभापतीपदासाठी माणिक बोरस्ते व दिलीप मोरे, उपसभापती पदासाठी रवींद्र पगार, राघो अहिरे, भगवंत बोराडे, रामदास गायकवाड, चिटणीस पदासाठी नानासाहेब बोरस्ते व डॉ. सुनील ढिकले यांच्यात सामना रंगणार आहे. इगतपुरी, कळवण व सुरगाणा, चांदवड, दिंडोरी व नांदगाव तालुका सदस्यासाठी प्रत्येकी दोन तर निफाड तालुका सदस्यासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 2:07 am

Web Title: maratha vidya prasarak shikshan sanstha election
Next Stories
1 धक्कादायक! चेष्टा केल्याच्या रागातून कुऱ्हाडीने घाव घालून तरुणाची हत्या
2 दुबार पेरणीचे संकट टळले
3 ‘समृद्धी’विरोधात निदर्शने
Just Now!
X