१६ रेल्वे गाडय़ा रद्द झाल्यामुळे स्थानकांवर शुकशुकाट

मध्य रेल्वेच्या मार्गावर बुधवारी सकाळी रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या पाच तासांच्या मेगा ब्लॉकमुळे मनमाडहून सुटणाऱ्या चार महत्त्वाच्या गाडय़ांसह मुंबई विभागातील तब्बल १६ मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नाशिक रोड, मनमाड येथे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नाताळमुळे शासकीय सुट्टी असल्याने नोकरदार आणि विद्यार्थी मात्र हाल होण्यापासून वाचले. बाहेरगावहून आलेल्या आणि जाणाऱ्या पर्यटकांचे मात्र हाल झाले.

मध्य रेल्वेच्या मार्गावरील ठाकुर्ली रेल्वे स्थानकांतील पादचारी पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेने बुधवारी सकाळी १० ते दुपारी दोन असा पाच तासांचा विशेष मेगाब्लॉक जाहीर केला. या मेगाब्लॉकमुळे राज्यराणी, पंचवटी, गोदावरीसह जनशताब्दी अशा जवळपास अप-डाऊन मार्गावरील १६ गाडय़ा रद्द केल्या होत्या.

परिणामी, मनमाडहून सुटणाऱ्या गाडय़ा रद्द झाल्याने नाशिक-मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सध्या नाताळनिमित्त सुट्टय़ा आहेत. वर्षअखेरीस अनेकजण पर्यटनाला निघतात. तर परराज्यांतून या काळात मोठय़ा संख्येने भाविक त्र्यंबकेश्वर, वणी गडावर जाण्यासाठी नाशिक रोड तर शिर्डी, औरंगाबाद येथे जाण्यासाठी मनमाडला येत असतात.

मुख्यत्वे या प्रवाशांची गैरसोय झाली. मनमाडहून सुटणारी मनमाड-मुंबई राज्यराणी, मनमाड-मुंबई पंचवटी, मनमाड-कुर्ला गोदावरी या गाडय़ा चाकरमान्यांसह दैनंदिन प्रवाशांसाठी उपयुक्त आहेत. त्या रद्द करण्यात आल्या. मनमाडहून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाडय़ा रद्द झाल्याने सकाळी मनमाड आणि नाशिक रोड रेल्वे स्थानकांत शुकशुकाट जाणवत होता. दुपारी १२ नंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

शासकीय सुट्टीमुळे दिलासा

शासकीय सुट्टी असल्याने नेहमी मुंबईला ये-जा करणारे नोकरदार, विद्यार्थी घरीच होते. शासकीय सुट्टीच्या दिवशी पंचवटी, गोदावरी या गाडय़ांमधील ६० टक्के प्रवासी कमी होतात. व्यापारी वर्ग कामांसाठी मुंबईला ये-जा करतात. ज्यांना या दिवशी मुंबईला जाणे आवश्यक होते, त्यांनी पर्यायी साधनांचा वापर केला.