नाशिक : जिल्ह्य़ात काही दिवसांपासून करोना साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंध आणि पाणी टंचाई यामुळे आदिवासी भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अनेकांना बेरोजगार व्हावे लागल्याने या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आदिवासी भागातील काही जण स्थलांतर करु लागले आहेत.

त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्य़ातील आदिवासी भागात कठोर निर्बंधामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

सरकारकडून आदिवासींसाठी विविध योजना जाहीर करण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचा लाभ अल्पावधींनाच मिळत आहे. पाणी प्रश्नासह अन्न, वीज, आरोग्य सुविधा आदी समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असतांना गाव पातळीवर अद्याप लसीकरणास सुरुवात झालेली नाही. सतत गाव, शहर बंद, गावात रोजगार नाही अशी विचित्र स्थिती आहे. त्यातच  हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह घरातील इतर सदस्यांना कोसो मैल पायपीट करावी लागत आहे.

पाण्यासाठीची वणवण आणि करोना निर्बंध हे संकट कमी म्हणून की काय व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तू चढय़ा भावाने विकल्या जात आहेत. आर्थिक चणचण, करोनाची भीती ,अवकाळी पावसाने मोठय़ा प्रमाणात झालेले पिकांचे नुकसान, या सर्व समस्यांमुळे आदिवासी भागातील जनतेची होरपळ होत आहे. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी काहींनी गाव सोडून स्थलांतराचा पर्याय निवडला.

ग्रामीण आदिवासी भागात करोना संसर्ग खंडित करण्यसाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे काम धंदे बंद आहेत. बहुतेकांचा उदरनिर्वाह मजुरीवर अवलंबून आहे. तोही आता मिळत नसल्याने जे मिळेल त्या कामाच्या शोधात लोक गाव सोडू लागले आहेत. आजही अनेक जण गिरणारे, मुंगसरा, सिन्नर आणि इतरत्र जात आहेत. या लोकांनी आता करोनाचे भय सोडून आपल्या पोटापाण्याला महत्व देण्याचे ठरविले आहे. त्यातच आता टाळेबंदी संपूर्ण जिल्ह्य़ात लागू करण्यात आल्याने त्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. जे काम मिळू शके ल असे वाटत होते, तेही मिळेनासे झाले आहे.  निवडणुकीप्रसंगी आदिवासी भागातील बेरोजगारी आणि पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचे आश्वासन नेत्यांकडून दिले जाते. परंतु, निवडणूक झाल्यावर त्या आश्वासनांनुसार काम के ले जात नसल्याने त्याचा फटका आदिवासींना कायम बसतो. लोकप्रतिनिधींकडून या समस्येतून मार्ग काढण्याचा कोणताच प्रयत्न होताना दिसत नसल्याने आदिवासी भागातील जनतेमध्ये नाराजी आहे.

पाण्याच्या झऱ्याचा शोध

एकिकडे ही परिस्थिती असतांना दुसरीकडे टंचाईनेही डोके  वर काल्याने गावात महिलावर्ग नदी-नाल्यांमध्ये पाण्याचा झरा शोधत आहेत.