जलसंपदा मंत्र्यांच्या नावाचा ‘आरोग्यदूता’कडून गैरवापर
सिंहस्थ कुंभमेळ्यापासून पालकमंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याची अप्रत्यक्षपणे जाणीव करून देणारा आणि प्रशासकीय पातळीवर अतिशय मुक्तपणे वावरणाऱ्या तुषार जगताप नामक व्यक्तीने आरोग्यदूत सेवाभावी संस्थेचा समन्वयक असल्याचे सांगून आपल्या नावाचा व छायाचित्राचा दुरुपयोग केल्याचे निदर्शनास आल्याचे खुद्द गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
या व्यक्तीला आपला कोणताही पाठिंबा नसून त्याच्याशी दुरान्वयेही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. मैत्रेय ठेवीदार बचाव कृती समितीच्या जाहिरातीमुळे चर्चा सुरू झाल्यावर पालकमंत्र्यांनी संबंधितांशी कोणताही संबंध नसल्याचे सांगून हात झटकले. संबंधिताने भविष्यात पुन्हा आपल्या नावाचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले; परंतु आपल्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्याविरुद्ध खुद्द पालकमंत्री काय कारवाई करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.मैत्रेय ठेवीदार बचाव कृती समितीच्या जाहिरातीत जगतापने कृती समितीचा अध्यक्ष असल्याचे नमूद केले. त्याच्या या कृतीशीही आपला संबंध नसल्याचे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे. ठेवीदारांच्या कृती समितीसाठी धडपड करणारे काही घटक मैत्रेयच्या वर्षां सत्पाळकर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधताना रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिपथास पडले होते.
मैत्रेय प्रकरणात शेकडो ठेवीदारांची कोटय़वधीची फसवणूक झाली आहे. बचाव समितीच्या जाहिरातीत अध्यक्ष असल्याचे सांगणाऱ्या जगताप या व्यक्तीने आरोग्यदूत सेवाभावी संस्थेचा दूत असल्याचे सांगून आपला नावाचा दुरुपयोग केल्याचे निदर्शनास आल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्रिपद भूषविणाऱ्या महाजन यांच्या अखत्यारीत अवघी शासकीय यंत्रणा आहे.
कुंभमेळ्यापासून अशा काही घटकांकडून पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून भासविले जात होते. आपले नाव व छायाचित्राचा वापर करणाऱ्याविरुद्ध खुद्द पालकमंत्री कारवाई करू शकतात. असे असताना त्यांनी संबंधिताने आपल्या नावाचा पुन्हा वापर केल्याचे आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे.

अनेक वर्षांपासून आरोग्य व इतर क्षेत्रांत सामाजिक जाणिवेतून कार्यरत असून गैरप्रकारांना थारा दिला नसल्याचे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे. याच सामाजिक भावनेतून जिल्ह्यातील विकास विषयक समस्या सोडविण्यासाठी व नागरिकांच्या सुविधेसाठी दिलीप हिवराळे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी आपल्या समस्यांबाबत त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाजन यांनी केले आहे. या आवाहनामुळे संबंधिताकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही आधी दिशाभूल केली गेली काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे.