आमदार सदाभाऊ खोत यांचा इशारा

नाशिक : अचानक निर्यातबंदी जाहीर के ल्याने बंदरात अडकून पडलेल्या कांद्याच्या निर्यातीला केंद्राने परवानगी न दिल्यास २३ सप्टेंबर रोजी खासदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा रयत क्रोंती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. निर्यातबंदीविरोधात निफाड तालुक्यातील विंचुर येथे (लासलगाव बाजार समितीचे उपबाजार आवार) या  ठिकाणी नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावर रयत क्रोंती संघटनेतर्फे  रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी खोत यांनी केंद्र सरकारला इशारा दिला. टाळेबंदीमुळे शेतकरी संकटात असताना के ंद्र सरकारने हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. आज बंदरावर निर्यातीसाठी ४०० कं टेनर थांबलेले आहेत. ६०० पेक्षा जास्त मालमोटारी बांगलादेशच्या सीमेवर आहेत. सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा कांदा हा अशा प्रकारे रस्त्यावर आहे. हा कांदा बाहेर गेला नाही तर तो सडणार आहे. लाखो शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. टाळेबंदीमुळे चाळीतच कांदा ५० ते ६० टक्के  सडलेला होता. उर्वरित ४० टक्के  कांदा शिल्लक आहे. त्याला कुठे तरी २५०० ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. तोटा भरून निघेल अशी शेतकऱ्याची अपेक्षा होती; परंतु त्या अपेक्षेवर पाणी फिरताना दिसत असल्याचे खोत यांनी सांगितले.

‘एक देश एक बाजारपेठ’ अशा घोषणा आपण करत आहोत. शेतकरी त्याचा शेतमाल कुठेही विकू शकतो, असे जर आपण म्हणत असू आणि दुसरीकडे कांदा निर्यातीवर बंदी घालणार असू तर निश्चितपणे कायद्याची कुठे तरी पायमल्ली होताना दिसत आहे. म्हणूनच २३ तारखेला जे खासदार शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरणार नाहीत, आंदोलन करणार नाहीत, त्या खासदारांच्या दारापुढे रयत क्रांती संघटना आणि इतर शेतकरी संघटना निदर्शने करतील, असा इशारा खोत यांनी दिला. बंदरावरून कांदा जर परत आला तर तो बॉम्ब म्हणून बाजार समितीत येईल. त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खोत यांनी केली.