मनसे, भाजप व रिपाइंचे अर्ज दाखल
महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदावर महाआघाडीने अखेर मनसेचा दावा मान्य केल्यामुळे या निमित्ताने अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची वर्तविली जाणारी शक्यता फोल ठरली. मनसे, राष्ट्रवादी व अपक्ष यांच्या महाआघाडीच्या वतीने सोमवारी मनसेचे सलीम शेख यांनी अर्ज दाखल केला. तर भाजप व रिपाइं सदस्यांनीही अर्ज दाखल केले आहेत.
महापालिका स्थायी समितीची निवडणूक २३ मार्च रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सोमवारी मनसेचे सलीम शेख, भाजपचे दिनकर पाटील आणि रिपाइंचे प्रकाश लोंढे यांनी आपले अर्ज दाखल केले. वर्षभरावर महापालिका निवडणूक असल्याने स्थायी सभापतिपद आपल्याकडे ठेवण्याचा मनसेचा प्रयत्न होता.
गतवर्षी त्याच अनुषंगाने तडजोड करून हे पद राष्ट्रवादीला दिले गेले होते. परंतु, यंदा स्थायीच्या निवृत्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीतील काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचा मनोदय बोलून दाखविला. काँग्रेसचे सदस्यही त्यास अपवाद राहिले नाही. मनसे आणि राष्ट्रवादी हे दोघे या पदावर दावा करू लागल्याने या निवडणुकीत महाआघाडी राहील की नाही, अशी चर्चा सुरू झाली; परंतु यावर सोमवारी पडदा पडला. महाआघाडीचे उमेदवार म्हणून मनसेच्या सलीम शेख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजप महाआघाडीशी दोन हात करण्याच्या तयारीत आहे.
भाजपचे पाटील आणि रिपाइंचे लोंढे यांनी त्या अनुषंगाने अर्ज दाखल केले आहेत. १६ सदस्यांच्या स्थायी समितीत मनसे पाच, राष्ट्रवादी तीन, काँग्रेस दोन, सेना तीन, भाजप दोन तर अपक्ष एक असे बलाबल आहे. स्थायीत महाआघाडीचे बहुमत दिसत असले तरी विरोधकांनी लढत देण्याचा मनसुबा ठेवला आहे.