नाशिक : शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने झोपडपट्टी परिसरात जलदपणे संशयितांची तपासणी करण्यासाठी करोना तपासणी वाहन कार्यान्वित करण्याचे निश्चित केले आहे. क्रन्सा डायग्नोस्टिक कंपनीच्या या फिरत्या वाहनातून संशयित रुग्णाचा एक्स रे, नमुना संकलन करणे आणि अन्य तपासण्या जागेवरच करणे शक्य होणार आहे. एका रुग्णाच्या तपासणीसाठी दोन हजार रुपयांचा खर्च येणार असून महापालिका तो करणार आहे.

मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. शहरात आतापर्यंत करोनाचे ४८ रुग्ण आढळले असून त्यातील ३२ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. दाटीवादीच्या रहिवासी क्षेत्रात करोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचे लक्षात येते. मालेगाव तसेच  मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा परिसर हे त्याचे उदाहरण आहे. शहरात झोपडपट्टी परिसरात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून तपासणीसाठी फिरत्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरात झोपडपट्टय़ांचे प्रमाण मोठे आहे. या भागात अतिशय दाट लोकवस्ती आहे. करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांचे सर्वेक्षण केले जाते. याप्रसंगी एखाद्या व्यक्तीत काही लक्षणे आढळल्यास त्याचे नमुने घ्यायचे की नाही हे वैद्यकीय अधिकारी निश्चित करतात. संबंधित रुग्णाला रुग्णालयात नेऊन नमुने घ्यावे लागतात. रुग्णांचे अहवाल पुणे, धुळ्याच्या प्रयोगशाळेत पाठविले जातात. अनेकदा रुग्ण रुग्णालयात येण्यास तयार नसतो. अशा प्रसंगात फिरते वाहन सहाय्यकारी ठरणार आहे. रुग्णाने रुग्णालयात येण्याऐवजी रुग्ण राहणाऱ्या भागात हे वाहन नेता येईल. संशयित रुग्णाचा एक्सरे, स्त्रावाचे नमुने घेण्यासाठी वाहनात व्यवस्था आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वैद्यकीय अधिकारी कोणाची तपासणी करायची कोणाची नाही हे निश्चित करेल. वेगाने तपासण्या करण्यासाठी या वाहनाची गरज चर्चेत व्यक्त झाली.