नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातून सध्या पक्ष्यांचे स्थलांतर होत असून बुधवारी १० हजार ३४७ पक्ष्यांची नोंद  करण्यात आली.

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात २०२१ मधील सातवी पक्षी गणना बुधवारी सकाळी झाली. वनअधिकारी, कर्मचारी, स्थानिक मार्गदर्शक, पक्षीमित्र, वन्यजीव अभ्यासक, स्वयंसेवक यांच्या मदतीने ही गणना पूर्ण करण्यात आली. करोनाच्या नियमांचे पालन यावेळी करण्यात आले. चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, मध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कु रुडगाव, काथरगाव अशा सात ठिकाणी पक्षी निरीक्षण करण्यात आले.

विविध पाणपक्षी आणि झाडांवरील पक्षी यांच्या नोंदी घेण्यात आल्या. एकू ण ५७ प्रजातींचे नऊ हजार २८५ पाणपक्षी आणि एक हजार ६२ झाडांवरील, गवताळ भागातील  पक्षी याप्रमाणे १० हजार ३४७ पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

यामध्ये मार्श हॅरियर, वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, चमचा, शेकाटय़ा, पाकोळी आदी पक्षी आढळून आले. यावेळी साहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपाल अशोक काळे, प्रा. आनंद बोरा आदी उपस्थित होते.