१००९ सदनिका बांधण्याचे नियोजन 

शहर पोलीस मुख्यालय, नाशिकरोड पोलीस वसाहतील बिकट अवस्थेत असणाऱ्या बैठय़ा चाळीतील सदनिका पाडून त्याजागी बहुमजली इमारतींत १००९ चांगल्या दर्जाच्या नव्या सदनिका बांधण्यासाठी आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून शहरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेडसावणारा शासकीय निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. या बाबतचा प्रस्ताव पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळास सादर झाला आहे.

पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या एकूण संख्याबळाचा विचार करता त्या तुलनेत उपलब्ध सेवा निवासस्थानांची संख्या जवळपास निम्म्याने कमी आहे. म्हणजे, निम्म्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतरत्र आपल्या निवासाची व्यवस्था करणे भाग पडले आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात २८० अधिकारी तर ३०३६ कर्मचारी हे मंजूर संख्याबळ आहे. निवासस्थानांची संख्या अधिकाऱ्यांसाठी जेमतेम ११० आणि कर्मचाऱ्यांसाठी १७१५. सद्यस्थितीत १३२१ कर्मचारी आणि १७२ अधिकारी या निवासस्थानांपासून वंचित आहेत. यामुळे निवासस्थानाची प्रतिक्षा यादी बरीच मोठी आहे.

शासकीय नियमानुसार किमान ७० टक्के कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध करून देणे आवश्यक असते. निवासस्थानांच्या अपुऱ्या संख्येमुळे तो निकषही पूर्ण होत नाही. एकंदर मनुष्यबळ आणि निवासस्थानांचा विचार करता हा निकष पूर्ण होण्यासाठी ४९३ निवासस्थानांची आवश्यकता आहे. या पाश्र्वभूमीवर, आयुक्तालयाने बहुमजली इमारतीत नव्याने सदनिका बांधण्याचा प्रस्ताव पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत शासनाला सादर केला आहे. पोलीस मुख्यालय आणि नाशिकरोड पोलीस वसाहतीत बैठय़ा चाळीची जागा आणि विहितगाव येथे उपलब्ध असणारा भूखंड यावर ही निवासस्थाने बांधण्याचे नियोजन आहे.

पोलीस मुख्यालयातील बैठय़ा चाळीत एकूण ४८७ निवासस्थाने आहेत. त्यांचे बांधकाम होऊन तब्बल पाच ते आठ दशकांचा कालावधी लोटला आहे. काही सदनिकांच्या भिंतीला तडे गेले तर काही सदनिकांच्या फरशा तुटून जमिनीत दबल्या गेल्या आहेत. पावसाळ्यात गळती होत असल्याने भिंत कोसळण्याची शक्यता असते. या सदनिकांची अवस्था इतकी बिकट आहे की, दुरुस्ती वा डागडुजी करूनही त्या राहण्यास उपयुक्त ठरणार नाहीत. तसा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. नाशिकरोडच्या बैठय़ा चाळींची वेगळी स्थिती नाही. ही निवासस्थाने दुरुस्ती करून राहण्यास उपयुक्त नाहीत असेही बांधकाम विभागाने सूचित केले आहे. जुन्या निवासस्थानांची दुरुस्ती व डागडुजीवर आजवर मोठय़ा प्रमाणात खर्च झाला आहे. या बाबी लक्षात घेऊन बैठय़ा चाळीतील जीर्ण निवासस्थाने पाडून तिथे नवीन चटई क्षेत्राप्रमाणे बहुमजली इमारती बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. नव्या चटई क्षेत्रानुसार सदनिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. पोलीस मुख्यालयात नवीन बांधकामानंतर अतिरिक्त ३०० सदनिका अधिक उपलब्ध होतील. नाशिकरोड वसाहतीत ही संख्या १२२ वरून २०२ सदनिका करण्याचे प्रयोजन आहे. विहितगाव येथे प्रस्तावित पोलीस ठाण्याची इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठी ५० गुंठे जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी २० निवासस्थाने उपलब्ध करून देता येतील, असे प्रस्तावात म्हटले आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास कर्मचाऱ्यांना भेडसावणारा निवासस्थानांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

बहुमजली इमारतीत नवीन निवासस्थाने

पोलीस मुख्यालय (शहर) आणि नाशिकरोड पोलीस वसाहतीतील बैठी चाळीची जागा आणि विहितगाव येथील भूखंड या ठिकाणी एकूण १००९ निवासस्थाने बांधण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. बहुमजली इमारतीत या सदनिकांची बांधणी प्रस्तावित आहे. या माध्यमातून शासकीय निवासस्थानांची आवश्यक तेवढी उपलब्धता होईल.

– विजय पाटील (पोलीस उपायुक्त, प्रशासन)

सद्यस्थिती

*  पोलीस आयुक्तालय एकूण मंजूर संख्याबळ – ३३१०

* पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध शासकीय निवासस्थाने – १८२५

* शासकीय निवासस्थान उपलब्ध नसणारे कर्मचारी – १४८५