नागपूरने १२ वर्षांआतील गटात सहा, तर १६ वर्षांआतील गटात पाच पदकांची कमाई करत येथे आयोजित लघू आणि उपकनिष्ठ राज्यस्तरीय जम्परोप स्पर्धेवर ठसा उमटविला. नाशिकने १० पदकांसह द्वितीय, तर सोलापूरने नऊ पदकांसह तृतीय क्रमांक मिळवला.

जिल्हा जम्परोप संघटनेच्या वतीने आणि कोंडाजी नामदेव दुधारे बहुद्देशीय संस्थेच्या सहकार्याने येथे या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे गटशिक्षण अधिकारी भीमराव गरड यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. या वेळी ठाण्याचे क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष क्रीडा संघटक रवींद्र चोथवे, महाराष्ट्र जम्परोप संघटनेचे अध्यक्ष रमेश मारवाडी, आनंद खरे, गुलाबराव पाटील, अशोक दुधारे आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी नाशिक आणि सोलापूरच्या खेळाडूंनी सुंदर प्रात्यक्षिके सादर केली. भीमराव गरड यांनी अशा खेळांचा शालेय स्तरावर दररोजच्या व्यायाम प्रकारात समावेश केल्यास शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांस त्याचा फायदा होईल आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, असे सांगितले. जम्परोपचा जिल्हा परिषदेच्या शालेय स्पर्धेत समावेश करण्यासाठी आपण आग्रह धरणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.