लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिलेला सामाजिक बांधिलकीचा वसा जपणारी सद्यस्थितीत निवडकच मंडळे राहिली आहेत. शहरातील १०१ वर्षांची परंपरा असलेले रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ हे त्यापैकीच एक. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मंडळाचा प्रसिध्द चांदीचा गणपती भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मंडळाने समाजभान जपत आपले वेगळेपण अबाधित ठेवले आहे.

१९२८ मध्ये गंगाप्रसाद हलवाई यांच्या पुढाकाराने स्थापन झालेले हे नाशिकमधील सर्वात जुने, अग्रगण्य मंडळ आहे. दरवर्षी नवीन मूर्ती बनविण्यापेक्षा मंडळाने १९७८ साली ११ किलो चांदीची मूर्तीची स्थापना केली. वाढता वाढता वाढे या उक्तीनुसार २००८ मध्ये २०१ किलोच्या भरीव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सध्या या मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार, तर कार्याध्यक्ष पोपटराव नागपुरे आहेत.

धार्मिकता जोपासताना मंडळ समाजसेवा करते. तरुणांना रोजगार निर्माण व्हावा, व्यापाऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे, या हेतूने मंडळाने सिद्धिविनायक नागरी पतसंस्थेची स्थापना केली. मंडळ आणि पतसंस्था यांच्यावतीने धर्मार्थ दवाखाना चालविला जातो. भविष्यात दवाखाना विस्ताराची योजना आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर मंडळाने माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. अनेक दिग्ग्जांच्या कलेचा आस्वाद नाशिककरांना त्यानिमित्ताने मिळाला.

रविवार कारंजा हे शहरातील मध्यवर्ती ठिकाण. पिण्याच्या पाण्यासाठी मंडळाने मंडईत पाणपोई सुरू केली. निरीक्षण गृहातील विद्यार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरची मदत, रक्तदान शिबीर, अपंगांच्या संस्थांना देणगी, कैद्यांची शारीरिक तपासणी, औषध वाटप, चष्मे वाटप, मधुमेह निवारण, आरोग्य तपासणी शिबिरे आदी उपक्रम राबविले जातात. आदिवासी पाडय़ांवरील मुलांसह गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले जाते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. हुशार परंतु आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या काही विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक जबाबदारी मंडळाने सांभाळली आहे.

नैसर्गिक आपत्तीप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते धावून जातात. अन्नधान्य, संसारोपयोगी वस्तूंचे वाटप तसेच स्वच्छता कार्यात मदत करतात. यंदा राज्यावर महापुराचे संकट कोसळले. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंडळाने ५१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांच्या स्वाधीन केला. भविष्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आणि नैसर्गिक आपत्तीने बाधित मुलांसाठी अनाथाश्रम सुरु करण्याचा मंडळाचा मानस आहे. क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाकडून आर्थिक मदत केली जाते. या वर्षी रोगनिदान शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जयपूर कृत्रिम पायांचे वाटप आणि अँजिओग्राफी शिबीर घेण्यात येणार आहे.

नेत्रदिपक देखावे

नेत्रदीपक देखावे सादर करण्यात मंडळाचा नावलौकिक आहे. आतापर्यंत मीनाक्षी मंदिर, अक्षरधाम, राजस्थानचा हवामहल, शिवमंदिर यासह रामायण, महाभारतातील दृश्य जिवंत देखाव्यातून साकारले आहेत. शतक महोत्सवी वर्षांत मंडळाने अष्टविनायक देखावा साकारला होता. यंदा संगीत रोषणाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मिरवणुकीत दणदणाट आणि गुलालाच्या वापराला फाटा देत मंडळाचे माऊली ढोलपथक पारंपरिकता जपण्यासाठी पुढे सरसावले आहे.