खासगी रुग्णालयांकडून दिरंगाई; जिल्ह्याच्या मृत्यूदरात वाढ

नाशिक : करोनाबाबत आरोग्य विभाग दररोज अतिशय अचूक माहिती, आकडेवारीच्या नोंदी ठेवत असल्याबद्दल काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशस्तीपत्रक दिले होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असताना याच आकडेवारीतील सावळागोंधळ समोर येत आहे. गुरुवारी एकाच दिवशी एकूण २७० रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली. यातील २६० मृत्यू हे मागील काळातील आहे. यावरून गदारोळ उडाल्यावर आरोग्य विभागाने या दिरंगाईस खासगी आणि निमशासकीय रुग्णालयांकडे

बोट दाखविले. पण, त्यांच्यावर असणारा ताण, तांत्रीक अडचणींची यादी मांडली. पुढील काही दिवस नोंदी अद्ययावत होत राहणार असल्याने मृत्यूची संख्या वाढणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

मुळात करोना काळात सर्व खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा प्रशासनाच्या ताब्यात होत्या. असे असताना करोना मृत्यूंची पोर्टलवर नोंद करण्यात होणाऱ्या दिरंगाईकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. खासगी, निमशासकीय रुग्णालयांनी आता पोर्टलवर मृत्यूंची नोंद करण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्याचा मृत्यूदर १.३१ टक्क्यांवरून १.३९ टक्के झाला आहे. जिल्ह्यात नाशिक, मालेगाव महापालिका, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद प्रशासनामार्फत १०४ करोना काळजी केंद्र, ५४ शासकीय आणि २३६ खासगी करोना केंद्र, दोन शासकीय व ३२ खासगी करोना रुग्णालय यांना मान्यता देऊन २० हजार ३३९ खाटांची उपलब्धता करण्यात आली.

दुसऱ्या लाटेत सर्वच रुग्णालयांवर रुग्ण उपचाराचा अतिरिक्त ताण होता. अत्यावश्यक औषधे, प्राणवायू, व्हेंटिलेटर, जीवरक्षक प्रणालीवरील रुग्णांचे यशस्वी नियोजन या सर्व बाबींचा डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण होता. रुग्ण नोंदणी, पोर्टलवर मृत्यू नोंदणी करणारे काही कर्मचारी बाधित झाले. अ‍ॅप कार्यान्वित न होणे, इंटरनेट संपर्कातील अडचणी, डाटा एंट्री करणारे अकुशल कर्मचारी आदी कारणास्तव काही रुग्णालयांकडून मागील काही महिन्यातील मृत्यू पोर्टलवर नोंदविले गेले नसल्याचे आरोग्य विभागाने मान्य केले आहे.

यंत्रणेने पाठपुरावा करून खासगी, निमशासकीय रुग्णालयांना ही माहिती अद्ययावत करण्यासाठी अंतिम मुदत दिली. त्यामुळे पोर्टलवर दैनंदिन मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी म्हटले आहे. गुरूवारी पोर्टलवर २७० पैकी मागील ४८ तासात १० मृत्यू तर मागील काही महिन्यातील २६० मृत्यू पोर्टलवर अद्ययावत झाल्यामुळे त्याचा समावेश जिल्ह्याच्या एकूण मृत्यूंमध्ये करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील १६७, ग्रामीण भागातील ९१, मालेगाव मनपा कार्यक्षेत्रातील दोन आणि जिल्हाबा १० मृत्यूंचा समावेश आहे. मृत्यू अद्ययावत करण्याची प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढलेली दिसणार असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.