४२ शेतकऱ्यांविरुद्ध दरोडय़ाचा गुन्हा

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला येवला तालुक्यात पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागले त्याचे दुसऱ्या दिवशीही पडसाद उमटले. अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तर धुळगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर पोलीस-शेतकरी यांच्यात संघर्ष होऊन हवेत गोळीबारही करावा लागला होता. या प्रकरणी पोलिसांनी ४२ शेतकऱ्यांविरुद्ध दरोडय़ाचा गुन्हे दाखल करत शोधमोहीम सुरू केली.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला येवला तालुक्यात हिंसक वळण लागले. पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर जमावाने मालमोटार पेटविणे, कृषिमाल रस्त्यावर फेकणे व तत्सम प्रकार घडले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अखेरीस अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडून हवेत गोळीबार करून जमावाला पांगवण्यात आले.

मोठी पोलीस कुमक तैनात करण्यात आल्यामुळे परिसरात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. या घडामोडींचे पडसाद शुक्रवारी उमटले. सकाळी साडेसात वाजता धुळगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी दहन केले. येवला-नाशिक महामार्गावर कांदा काढून मालमोटार रिकामी करण्यात आली. जळगावनेऊर, नगरसूल गावात आठवडे बाजार बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला. सायगाव येथे आंब्याचा ट्रक रस्त्यावर अडवून खाली करण्यात आला. शहरात दुधाची चणचण भासल्याने चहाची दुकाने बंद होती. खेडय़ातून शहरात आलेले किटल्यांमधील दूध रस्त्यावर ओतून देण्याचे प्रकार ठिकठिकाणी घडले.

दरम्यान, नगर-मनमाड रस्त्यावरील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्यामुळे शुक्रवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. रस्त्यावरून जाणारी माल वाहतूक मात्र रोडावली. टोल नाक्यावरील उद्रेकाप्रकरणी प्रारंभी ४२ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. टोल नाक्यावरील सीसी टीव्ही चित्रणाचे अवलोकन करून टप्प्याटप्प्याने सुमारे हजार ते बाराशे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण व स्थानिक पोलीस मिळून या घटनेत लुटल्या गेलेल्या वस्तूंबाबत शोध मोहीम हाती घेऊन संशयितांवर कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुन्हे मागे घेण्यासाठी सोमवारी रास्ता रोको

शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया येवला पोलीस ठाण्यात सुरू असताना शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेतली. हे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू होते. त्यामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नये, अशी मागणी केली. पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याने सर्वपक्षीय नेते, आ. पंकज भुजबळ, संभाजीराजे पवार आदींनी निषेध नोंदवत येवला-विंचूर चौफुलीवर काही काळ रास्तारोको केला. आंदोलक शेतकऱ्यांवर आकसापोटी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे कलम कलम लावण्यात आले आहे. तसेच नाटेगाव येथील शेतकऱ्याच्या मृत्यूस पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर सोमवारी येवला शहर आणि तालुका बंद ठेवून येवला- विंचूर चौफुलीवर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील यांनी सांगितले.