News Flash

नाशिकची राष्ट्रवादीकडे सामूहिक जबाबदारी

अजित पवार यांनी भुजबळ हा विषय राष्ट्रवादीसाठी एकप्रकारे संपुष्टात आल्याचे अप्रत्यक्षपणे येथे सूचित केले.

अजित पवार यांच्याकडून भुजबळांच्या चुकांवर बोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी जे करणे आवश्यक होते, ते सर्व काही पक्षाने केले आहे. कायदा सर्वाना समान असतो आणि तो त्याचे काम करतो. पक्षाचे काम कधीही थांबत नसते, ते पुढे चालत राहते, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता नाशिकची सामूहिक जबाबदारी स्वीकारली आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ हा विषय राष्ट्रवादीसाठी एकप्रकारे संपुष्टात आल्याचे अप्रत्यक्षपणे येथे सूचित केले.

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येथे आले असता भुजबळ व त्यांच्या समर्थकांना पक्षाकडून बाजूला सारले जात असल्याच्या मुद्यावर पवार यांनी वेगवेगळे दाखले दिले. वरिष्ठ नेत्यांनी नाशिकमध्ये पक्षाला वाऱ्यावर सोडलेले नाही. पक्षाध्यक्षांपासून सर्व नेते या ठिकाणी सातत्याने येतात. भुजबळ सध्या कारागृहात आहेत. पक्षाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा वेगळा दृष्टिकोन आहे. या संदर्भात पक्ष नेतृत्वाने सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच दिली आहेत. परंतु, जनता तसा विचार करत नाही.  शेतकरी मेळाव्यात भुजबळांचे छायाचित्र हटविले गेले. जनभावना लक्षात घेऊन फलकावर त्यांचे छायाचित्र न ठेवण्याची कृती घडली असेल असेही त्यांनी नमूद केले.

आपणासह प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचीही चौकशी सुरू आहे. कायद्याचा सर्वानी आदर करणे गरजेचे आहे. आ. पंकज भुजबळांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला, असा दाखला त्यांनी दिला. सत्तेत असताना नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आपल्याकडे नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेत समविचारी पक्षांशी आघाडी न करता इतर पक्षांशी हातमिळवणी केली गेली. संबंधितांकडून मग दबावाचे राजकारण केले जाते. अशा चुकांमुळे इतर पक्षीयांचे नाहक महत्त्व वाढले. तेव्हा झालेल्या चुका आता दुरुस्त केल्या जाणार असल्याचे सांगत पवार यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळ यांच्या तेव्हाच्या राजकारणावर बोट ठेवले. काही वर्षांपूर्वी स्वच्छ प्रतिमेचे नेते आर. आर. पाटील यांच्या अकस्मात निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले. राष्ट्रवादीने आबांची मुलगी व पत्नीला निवडणुकीतून पुढे आणले. नवे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन पक्षाचे काम सुरू राहते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जिथे मतैक्य, तिथे आघाडी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत समविचारी पक्ष अर्थात काँग्रेस, शेकाप यांच्याशी युती करावी की नाही याबद्दलचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात ज्या तालुक्यात उभयतांमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढविण्याबाबत मतैक्य घडेल, तिथे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. ज्या तालुक्यात असे होणार नाही, तिथे स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

मनसेकडून भ्रमनिरास

जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्यांना राष्ट्रवादीतर्फे तिकीट दिले जाणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणही केले गेले असून उमेदवारी देताना स्थानिक पातळीवर माहिती घेऊन नावे निश्चित केली जातील. सत्तेवर येण्यासाठी गतवेळी नाशिकमध्ये मनसेने वारेमाप आश्वासने दिली होती. परंतु, शहरवासीयांचा भ्रमनिरास झाला. नाशिकमधील काही प्रकल्पांचे काम पाहण्यासाठी मोठे उद्योगपती व चित्रपट कलावंतांना सध्या आमंत्रित केले जात आहे. राष्ट्रवादीने पुणे व पिंप्री चिंचवड शहरांचा जो कायापालट केला आहे, त्याच धर्तीवर, नाशिकचा विकास करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील. वाढती गुन्हेगारी हा विषयही प्रामुख्याने मांडला जाईल. गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असणाऱ्यांना तिकीट देण्याचा पक्षाचा विचार नाही.

परंतु, त्यात कोणी निष्पाप व्यक्तीवर खोटे-नाटे गुन्हे दाखल होऊन त्याचे राजकीय करिअर

संपुष्टात येऊ नये अशी अपेक्षा आहे. महापालिका निवडणुकीत आघाडीबाबतची बोलणी पूर्णत्वास गेली असून केवळ सात ते आठ जागांबाबतचा तिढा लवकर सुटेल, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 1:11 am

Web Title: nashik collective responsibility of ncp days ajit pawar
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांकडून असभ्य शब्दांचा वापर
2 अर्थसंकल्प स्वागतार्ह आणि निराशाजनकही!
3 रागाच्या भरात वर्गमित्रानेच केला खून
Just Now!
X