जिल्ह्यात सध्या दररोज १२ ते १५ हजार चाचण्या होत असल्या तरी त्यांचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याचे चित्र आहे. दैनंदिन जवळपास १० हजार अहवाल प्रलंबित असतात. महापालिकेच्या नुकत्याच कार्यान्वित झालेल्या प्रयोगशाळेतील चार कर्मचारी बाधित झाल्यामुळे तेथील तपासणीवर मर्यादा आल्या आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज साडेतीन हजार नमुन्यांची तपासणी होत आहे. नाशिकबाहेरील काही खासगी प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर नमुने घेतात. पण, त्यांचे अहवाल मिळण्यास तीन-चार दिवस तिष्ठत बसावे लागते. ही दिरंगाई करोनाचा प्रादुर्भाव वाढविण्याबरोबर बाधितांना वेळेवर उपचार मिळण्यात अडसर ठरणारी आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. तातडीने निदान करता यावे म्हणून महापालिकेने नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात नवीन प्रयोगशाळा कार्यान्वित केली. प्रारंभी दैनंदिन दोन हजार आणि नंतर पाच हजारापर्यंत नमुन्यांची तपासणी करता येईल, असे नियोजन करण्यात आले. दुसरीकडे आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता पाच हजारपर्यंत विस्तारण्याचे जाहीर केले. सध्या दररोज १२ ते १५ हजाराच्या आसपास चाचण्या होत आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सोमवारी जिल्ह्यात आठ हजार २३० आरटीपीसीआर तर चार हजार ५२६ प्रतिजन अशा एकूण १२ हजार ७५६ चाचण्या झाल्या. या दिवशी ३५८८ अहवाल सकारात्मक आले.

जलद प्रतिजन चाचणीचा अहवाल काही वेळात मिळतो. आरटीपीसीआर अहवालास किमान १२ ते २४ तासाचा अवधी लागतो. या दिवशी १० हजार १४८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले नव्हते.

काही दिवसांपूर्वी अहवाल घेण्यासाठी नमुने देणारे अनेक जण महापालिकेच्या रुग्णालयात खेटा मारत होते. तीन, चार खासगी प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर नमुने घेऊन मुंबई, पुण्यात पाठवितात. अशा ठिकाणी नमुने देणाऱ्या नागरिकांना चार ते पाच दिवस प्रतीक्षा करावी लागते. अहवाल येईपर्यंत संबंधितांचा जीव टांगणीला लागतो. अनेकांच्या ते संपर्कात येण्याची शक्यता असते. संबंधिताचा अहवाल सकारात्मक आल्यास उपचारासही विलंब होतो. हे सर्व टाळण्यासाठी अहवाल वेळेत मिळण्याची नितांत गरज आहे. तथापि, काही खासगी प्रयोगशाळेत पैसे मोजून नमुने देणाऱ्यांना तिष्ठत राहावे लागत आहे. या संदर्भात दातार जेनेटिक्सने बाधितांची वाढती संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन अत्यवस्थ, आपत्कालीन परिस्थिती असल्यास सहा ते आठ तासात तात्काळ सेवा देत असल्याचे म्हटले  आहे.  आमच्या नमुने संकलन केंद्रांवर अत्यवस्थ रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, अपंग व्यक्ती आदींचे नमुने प्राधान्याने घेतले जातात. नमुने संकलन केंद्राचा कार्यकाळ सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत विस्तारला गेल्याकडे संबंधितांनी लक्ष वेधले. नाशिकबाहेरील अनेक खासगी प्रयोगशाळा सध्या स्थानिक पातळीवर नमुने संकलन करतात. त्यांच्याकडून काही जणांना पाच ते सात दिवसांनी अहवाल मिळाल्याची उदाहरणे आहेत.

पालिका प्रयोगशाळेत ५००, जिल्हा रुग्णालयात ३५०० नमुन्यांची तपासणी

महापालिकेच्या प्रयोगशाळेतील चार कर्मचारी बाधित झाले आहेत. सध्या तिथे केवळ ४०० ते ५०० नमुन्यांची तपासणी केली जाते. संबंधितांना काही दिवसांपूर्वी प्रशिक्षण देण्यात आले होते. कर्मचारी बाधित असल्याने दैनंदिन कामावर मर्यादा आली आहे. शहरात दैनंदिन संकलित होणारे नमुने शासकीय, खासगी प्रयोगशाळेत पाठविले जातात. साधारणत: २४ तासात अहवाल प्राप्त होतो असे महापालिकेचे आरोग्य-वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत सध्या दररोज साडेतीन हजार नमुन्यांची तपासणी होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी नमूद केले. ही क्षमता लवकरच पाच हजारापर्यंत नेली जाईल. साधारणत: २४ तासात अहवाल मिळतो. त्यामुळे आज ज्यांचे नमुने घेतले, त्यांचे अहवाल दुसऱ्या दिवशी प्राप्त होतात. या काळात त्यांचे अहवाल प्रलंबित दिसतात, असा दावा थोरात यांच्यासह नागरगोजे यांनी केला.