पोलीस आयुक्तालयाचा संकल्प

सर्वसमावेशक चळवळीतून अपघातांमध्ये लक्षणीय घट आणून नाशिकला वाहतुकीच्या दृष्टीने देशातील सर्वात सुरक्षित शहर बनविण्याचा संकल्प पोलीस आयुक्तालयाने सोडला आहे. त्या अंतर्गत पुढील तीन महिने वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे पालन व्हावे याकरिता पोलीस यंत्रणा वारंवार मोहीम राबविते. वाहनधारक ज्या रस्त्यांवरून मार्गक्रमण करतात, त्यातील अनेक त्रुटीही अपघातांचे कारण ठरतात. महापालिकेशी निगडित या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. वाहने उभी करण्यासाठी शहरात पुरेसे वाहनतळ नाही. विशिष्ट चौकात भरधाव जाणारी वाहने संथ होतील याची व्यवस्था नाही. काही मार्गावर कोणाच्या तरी सोईसाठी दुभाजक फोडून काढलेली वाट सुरक्षित वाहतुकीला सुरुंग लावते. वाहनधारकांना नियमांचे ज्ञानामृत पाजताना धोकादायक वाहतुकीला कारक ठरलेल्या अन्य घटकांकडे तितक्याच गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा वाहनधारक व्यक्त करीत आहे.

अपघातांचे प्रमाण कमी करण्यास राज्यात नाशिक प्रथम क्रमांकावर असल्याची आकडेवारी समोर आली. सुमारे दोन वर्षांपूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकारातून लोकप्रतिनिधी, नागरिक, वाहनचालक, वाहतुकीवर काम करणाऱ्या संस्था, प्राध्यापक आदींची बैठक पार पडली होती. त्यात चर्चेचा ऊहापोह होऊन वाहतुकीशी निगडित नेमके प्रश्न निदर्शनास आले. याच स्वरुपाची बैठक नुकतीच पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काय काय उपाय योजना करता येतील हा या बैठकीचा विषय. स्वयंसेवी संस्था, एनएसएसचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी यांच्यात वेगवेगळ्या मुद्यांवर पुन्हा नव्याने चर्चा घडली. नागरिकांची वाहतूक नियमांबद्दलची मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. या पाश्र्वभूमीवर, वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती पुढील तीन महिने सर्वसमावेशक चळवळ म्हणून राबविण्याचे निश्चित करण्यात आले. या उपक्रमात नागरिकांनी सक्रियपणे सहभाग नोंदवावा, यासाठी विशेष भर दिला जाणार आहे.जनजागृतीसाठी विद्यार्थी, महिला बचत गट, विविध स्वयंसेवी संस्था यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे.

वाहतूक असुरक्षित कशी होते?

केवळ वाहनधारकांसमोर नियमावलीची उजळणी करून सुरक्षित वाहतुकीचा मुख्य उद्देश साध्य होणे अवघड आहे. त्याकरिता वाहतूक असुरक्षित कशामुळे होते याकडे लक्ष द्यावे लागेल. क्षमतेहून अधिक प्रवाशांची वाहतूक सुरक्षित ठरू शकत नाही. पोलीस आयुक्तालयाच्या समोरील गंगापूर रस्त्यावर प्रवाशांनी खच्चून भरलेल्या रिक्षांची चोवीस तास वाहतूक सुरू असते. चालक बिनधास्त मागे चार आणि आपल्या शेजारी दोन-तीन प्रवासी बसवतो. या रस्त्यासह सर्वच मार्गावर यापेक्षा वेगळी स्थिती नसते. संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई होत नाही. परिणामी, नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतो. अनेक मार्गावर पालिकेने दुभाजक बसविले आहे. राजकीय प्रभाव टाकून कोणी पेट्रोल पंपासाठी, तर कोणी हॉटेलसाठी या दुभाजकांतून सोयीचा मार्ग काढून घेतो. रस्त्यात मध्येच दुभाजकातून काढलेले मार्ग वाहतुकीला धोकादायक ठरतात. त्र्यंबक नाका-गडकरी चौक यामध्ये पेट्रोल पंपासाठी दुभाजकातून ठेवलेला मार्ग प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. त्यामुळे अन्य वाहनधारकांना जाच होतो, मुख्य रस्त्यावरील वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. काही ठिकाणी दुभाजक फोडून दुचाकींसाठी जागा केल्याचे दिसते. गंगापूर रस्त्यावर पोलीस कल्याण निधीतील पेट्रोल पंपाच्या समोरील बाजूला दुचाकीचालक असेच ये-जा करताना दिसतात. सुरळीत वाहतुकीसाठी दुभाजकाला मध्येच कात्री लागणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांमुळे काही चौक धोकादायक झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी सिग्नल व्यवस्था करता येत नसली तरी गतिरोधकासारख्या उपायाने संभाव्य अपघात टाळता येतील. चोपडा लॉन्सपुढील पूल ओलांडल्यानंतर मखमलाबाद, रामवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यांचा चौक त्याच धाटणीचा आहे. सर्व बाजूने वेगाने वाहने येतात. गतिरोधक नसल्याने कोणी थांबण्याच्या मनस्थितीत नसते. यामुळे मोठा अपघात घडू शकतो. शहरात असे अनेक चौक असून प्रत्येक ठिकाणचे प्रश्न लक्षात घेऊन उपाय योजता येतील. अधिकृत वाहनतळांची अल्प संख्या वाहतूक कोंडीचे कारण ठरते. वाहनतळ, रिक्षा थांबे यांची संख्या वाढवून रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करता येईल. उपरोक्त काही विषय महापालिकेशी निगडित आहे. पोलिसांनी पाठपुरावा केल्यास पालिकेला ते करणे भाग पडेल, अशी अपेक्षा वाहनधारक बाळगून आहे.